पुणे – घरफोडी करुन पळून जाणाऱ्या शिकलगरी गुन्हेगारांनी पोलिसांच्या गस्ती पथकावर हल्ला केला. ही घटना वारजे माळवाडी येथील आंबेडकर चौकात घडली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सागरसिंग कालूसिंग जुन्नी ( रा वैदूवाडी हडपसर ) जलसिंग जर्मनसिंग जुन्नी ( रा पाटील इस्टेट झोपडपट्टी , शिवाजी नगर ) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वारजे माळवाडी गस्ती पथकाला मंगळवारी रात्री साईराम व्हील सोसायटीमध्ये घरफोडी होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार गस्तीवरील पथक तेथे पोहचले असताना घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार पळून जाऊ लागले होते.
पोलिसांनी त्यांना पाठलाग करुन मुद्देमालासह रंगेहाथ पकडले. मात्र पोलिसांकडून सुटका होण्यासाठी यातील एकाने मार्शलवर सुऱ्याने वार केले. मात्र अंगावरील रेनकोटमुळे मार्शल बालंबाल बचावला. चाकूच्या वाराने पोलिस मार्शलच्या अंगावरील रेनकोट फाटला, मात्र त्याला इजा झाली नाही. त्यांच्याकडून 1 लाख 48 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, गुन्हयात वापरलेली दुचाकी आदी ऐवज हस्तगत करण्यात आला. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक येवले करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिस घटनास्थळी पोहचले. यावेळी दोघे आरोपी दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यांना मार्शल शिरसाठ व फिरोज शेख यांनी पकडून ठेवले. त्यांना पकडताना त्यांनी पोलिसवाले को खतम कर दो म्हणत चाकूने हल्ला केला. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत यांनी भेट दिली. आरोपींवर चोरी, खुनाचा प्रयत्न , सरकारी कामात अडथळा असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.