पुणे : घर कुलुपबंद करुन गावी जाणाऱ्यांनो सावधान! कारण तुमच्या घरावर पाळत ठेवून चोरटे कधी तुमचे घर “साफ’ करतील याचा नेम नाही. सध्या बंद घरांची कुलुपे तोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांनी शहरभर धुमाकूळ घातला आहे. विविध पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल होत असून, एका दिवसांत चोरट्यांनी तब्बल साडेसहा लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.
हडपसर येथील ससाणेनगरमधील दोन सदनिकांमध्ये चोरट्यांनी चोरी केली. त्याबाबत श्रीकांत अंकुश कदम (रा. ससाणेनगर) यांनी फिर्याद दिली. त्यामध्ये चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर असा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरला, तर आणखी एकाच्या घराचे तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा 27 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला.
खराडीतील चौधरी वस्तीतील घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा दीड लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत विजय बाबुराव शेटे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सासरे आजारी असल्याने फिर्यादी कुटुंबासह त्यांच्या गावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
येरवड्यातील मोहनवाडी येथील ज्येष्ठ नागरिक दोन महिन्यांपासून मूळ गावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे सेफ्टी डोअर आणि दरवाजाचा कोयंडा कापून घरातील एक लाख रुपयांची रक्कम आणि दागिने लंपास केले. याबाबत जीवन शांताराम भोसले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केसनंद येथील पाटील वस्तीत आणि कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगरमध्ये चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा उचकटून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरले.
अशी घ्या काळजी
– गावी जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्या.
– पैसे, दागिने घरात ठेवण्याऐवजी बॅंकेत ठेवा.
– सीसीटिव्ही कॅमेरे बसविल्यास उत्तमच.
– गावी असला तरी शेजाऱ्यांच्या संपर्कात राहा.