मुंबई – कोविड-19 च्या काळात जगभर आर्थिक परिस्थिती बिघडलेली असताना, आणि बॅंकांमधील ठेवींमधून फारशा उत्पन्नाची आशा नसण्याच्या काळात, बेरोजगारी वाढत असताना, कमी गुंतवणुकीत जादा पैसे मिळवण्याचा एक मार्ग आयपीओमधील गुंतवणूक ठरत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे बर्गर किंगच्या आयपीओने केलेली कामगिरी.
बर्गर किंग इंडिया कंपनीचा आयपीओ म्हणजे प्राथमिक समभाग विक्री कमालीची यशस्वी झाली आहे. त्या आयपीओची किंमत 59 ते 60 रुपये होती. डिसेंबर महिन्याच्या 2 ते 4 तारखेदरम्यान हा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी खुला होता. दिनांक 9 डिसेंबरला शेअर्सचे वितरण करण्यात आले. आज 14 डिसेंबर रोजी या आयपीओची शेअरबाजारावर नोंदणी 115 रुपयांवर झाली. बाजार बंद होताना बर्गर किंगच्या शेअरची किंमत 138 रुपयांवर गेली. म्हणजेच दहा दिवसांत या गुंतवणुकीवर 60 रुपयांचे 138 रुपये झाले.
या आयपीओची बऱ्याच गुंतवणूकदारांनी मागणी केल्यामुळे वितरणावेळी अनेकांना निराशा सहन करावी लागली. मात्र, हे शेअर ज्यांना मिळाले त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य दुपटीपेक्षा जास्त वधारले. एकूण कंपनीचे कामकाज व भारतातील विस्तार कार्यक्रम पाहता दीर्घ पल्ल्यातील गुंतवणूकदारांना काही भाग बाळगण्यास हरकत नाही असा सल्ला काही विश्लेषकांनी दिला आहे. मात्र, लघु पल्ल्यातील गुंतवणूकदारांनी नफा कमवून मोकळे होण्यास हरकत नाही. अन्नपुरवठा क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या आयपीआपेक्षा बर्गर किंगच्या आयपीओचा भाव कमी ठेवल्यामुळे लिस्टिंगवेळी जास्त प्रिमिअमची शक्यता गृहीत धरण्यात आली होती.
दीर्घ पल्ल्यात कंपनी वाढण्याची शक्यता असल्यामुळे दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणूकदारांनी काही गुंतवणूक कायम ठेवण्यास हरकत नाही असे अँजेल ब्रोकिंगचे विश्लेषक केशव लाहोटी यांनी सांगितले. लिस्टींगवरून कंपनी मजबूत असल्याचे दिसून येते. आगामी काळात कंपनीने विस्तार केल्यानंतर ती नफ्यात येऊ शकते. मात्र, ज्यांना या कंपनीचा शेअर खरेदी करण्याची इच्छा आहेत त्यांनी तो 90 रुपयांपेक्षा जास्त भावाने खरेदी करू नये असा सल्ला मेहता इक्विटी या संस्थेचा संशोधक प्रशांत कापसे यांनी दिला आहे.
या महिन्यात आणखी आयपीओ येणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपले नशीब आजमावयला आणखी मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.