दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या “बंटी-बबली’ला ठोकल्या बेड्या

दुकानाच्या उद्‌घाटनादिवशीच चोरले होते पावणेदोन लाखांचे दागिने

लोणंद – येथील लक्ष्मी प्लाझा या इमारतीतील लक्ष्मी गोल्ड या दागिन्यांच्या दुकानाच्या उद्‌घाटनाच्या दिवशीच हातचलाखीने एक लाख 86 हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या “बंटी-बबली’ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरी प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्योत्स्ना सूरज कछवाय (वय 29, रा. आंबेगाव खुर्द, पुणे) व नीलेश मोहन घुते (वय 34, गुजरवाडी फाटा, कात्रज, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत.

लोणंद येथील लक्ष्मी गोल्ड या नवीन दुकानाचे उद्‌घाटनाच्या दि. 9 सप्टेंबर रोजी झाले होते. त्याच दिवशी एक महिला व पुरुषाच्या जोडगोळीने “बंटी-बबली’ स्टाइलने हातचलाखी करत, एक लाख 86 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत कौशल्याने तपास केला.

तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणे येथून जोत्स्ना कछवाय व नीलेश घुते या सराईत चोरट्यांना चतुर्भुज केले. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज व गुन्ह्यात वापलेली मारुती वॅगनार कार जप्त करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, स्वाती पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस नाईक संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजीत घनवट, फैयाज शेख, अविनाश शिंदे, अमोल पवार, केतन लाळगे, गोविंद आंधळे, वैशाली नेवसे, प्रिया नरुटे यांनी ही कारवाई केली.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.