बंधाऱ्याचे ढापे भंगारात; अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल नाही

निमसाखर – निमसाखर (ता. इंदापूर) हद्दीत कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून बंधारा चौकीलगत गेल्या अनेक महिन्यांपासून बेवारसपणे लोखंडी ढापे पडलेले होते. मध्यंतरीच्या काळात मात्र कित्येक ढापे भंगारात विकले गेल्याने कोरड्या बंधाऱ्याच्या कारभारातही पाणी कुठे तरी मुरत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.

इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील निमसाखर हे नीरा नदीकिनारी वसलेले साडेपाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. नीरा नदीवरील पळसमंडळ (माळशिरस, जि. सोलापूर) गावानजीकचा हा बंधारा असून या बंधाऱ्याचे 28 वर्षांपूर्वी काम झाले आहे. या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या कामातील “गडबडी’ची आजही मोठ्या चवीने चर्चा होते. त्यातच आता ढापे भंगारात विकले जात असल्याने पुन्हा या चर्चेला उजाळा मिळत आहे. या लोखंडी ढाप्यांच्या भंगार विक्रीबाबत संबंधीत जलसंपदा विभागाच्या निमगांव केतकी शाखेकडे स्थानिक ग्रामस्थांनी तोंडी स्वरुपात कळविले होते. त्यावेळी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांना पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्या याबाबत अद्याप काहीच हालचाल झाल्याचे दिसत नाही, या उलट ढाप्यांची संख्या कमी होत चालली आहे. प्रत्यक्ष बंधारा भागात असलेल्या लोखंडी ढाप्यांची संख्या 250 ते 300 इतकी आणि खात्याकडे नोंद 922 ढापे अशी असल्याने यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. याबाबत संबंधितांकडूनही दुजोरा दिला जात असला तरी ढापे भंगारात विक्रीला कोणाचे पाठबळ मिळत आहे, असा सवालही ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

शिवसेना करणार आंदोलन…
निमगांव केतकीच्या जलसंपदा विभागास आम्ही प्रत्यक्ष भेटून ढापे चोरी झाल्याचे कळविले होते. परंतु, अनेक दिवस उलटुनही काहीच कारवाई झालेली नाही. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधीतांवर शासकीय मालमत्तेवर दरोडा टाकल्याप्रकरणी कलम 395 अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अन्यथा दि. 5/7/2019 पासुन इंदापूर तालुका शिवसेना व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांसह आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी सुदर्शन रणवरे यांनी दिला आहे.

निमसाखर येथील पळसमंडळ (ता. माळशिरस) बंधाऱ्या जवळील चौकीलगत नवे, जुने ढापे ठेवण्यात आले आहेत. यातील काही ढापे गायब असल्याची तक्रार असुन या संदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांनी पाहणी करुन हे ढापे बरोबर असल्याचे तोंडी सांगितले आहे. संबंधीत अधिकाऱ्याकडून लेखी अहवाल मागविला असून यामध्ये तफावत असेल तर याला संबंधीत अधिकाऱ्यास जबाबदार धरण्यात येईल.
– ए.बी.जमदाडे, उपअभियंता, निमगांव केतकी शाखा, जलसंपदा विभाग

Leave A Reply

Your email address will not be published.