बर्लिन – थॉमस म्युलरचे अप्रतिम आक्रमण व सर्वोत्तम पासेसच्या जोरावर बायर्न म्युनिकने बुंदेसलीगा फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात आयनट्रा फ्रॅंकफर्ट संघावर 5-2 अशी मात केली. या विजयामुळे 4 गुणांची कमाई करत त्यांनी स्पर्धेत सर्वाधिक गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे.
बायर्नकडून लिऑन गोरेत्झ, रॉबर्ट लिव्हानोवस्की व अफोन्स डेव्हिस यांनी गोल करत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. मात्र, फ्रॅंकफर्ट संघाचे आक्रमण निष्प्रभ करत म्युलरने प्रतिआक्रमण करत केलेला खेळ सर्वाधिक चर्चिला गेला. त्याने एकच गोल केला पण साखळी सामन्यातील पराभवाचा वटपा काढताना त्याने बायर्नला विजयी मार्गावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या स्पर्धेच्या साखळी फेरीतील आधी झालेल्या सामन्यात फ्रॅंकफर्ट संघाने बायर्नचा 5-1 असा दारुण पराभव केला होता. त्यावेळी गुणतालिकेत ते पिछाडीवर पडणार असे चित्र दिसत होते. मात्र, म्युलरने त्यानंतरच्या प्रत्येक सामन्यात आक्रमक खेळ करत संघाला विजयाच्या मार्गावर आणले. आता गुणतालिकेत बायर्नने 61 गुण नोंदवताना क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेतली आहे.