लाहोर – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर काही दिवसांपूर्वी टीका करणारा पाकिस्तानचा माजी अष्टपैलु अब्दुल रज्जाक याने आता मात्र बुमराहचे कौतुक केले आहे. एक गुणवान खेळाडू ते महान क्रिकेटपटू असा प्रवास आता बुमराहचा सुरु झाला आहे, अशा शब्दात रज्जाकने आपले मत व्यक्त केले आहे.
काही महिन्यांपूर्वी रज्जाकने बुमराहला क्लब दर्जाचा गोलंदाज असे संबोधले होते. तसेच त्याच्या गोलंदाजीवर मी सातत्याने चौकार व षटकार फटकावले असते. जागतिक पातळीवर त्याला महान गोलंदाज म्हणून पाहिले जाते हे पटत नाही असे रज्जाकने त्यावेळी म्हटले होते. मात्र, त्यावेळी वसिम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, कर्टली अम्ब्रोस यांच्याशी त्याची केवळ मी तुलना केली होती पण माझ्या वक्तव्याचा त्यावेळी माध्यमांनी विपर्यास केला असेही रज्जाकने स्पष्ट केले.
गेल्या दीड वर्षातील बुमराहची कामगिरी पाहिली तर तो जगात सर्वात भेदक गोलंदाज बनण्याच्या मार्गावर आहे. येत्या काळात भारतीय संघाकडे बुमराह नावाचे अस्त्र असल्याचे स्पष्ट होत आहे. जसे आमच्याकडे अक्रम, वकार युनुस किंवा शोएब अख्तर होते तसे आता भारतीय संघाकडे बुमराहसह अनेक गुणवान गोलंदाज आहेत. येत्या काळात बुमराह जागतिक क्रिकेटवर आपले वर्चस्व निर्माण करेल यात शंका नाही, असेही रज्जाक म्हणाला.
बुमराह आजच्या आधुनिक क्रिकेटमधील सर्वात भेदक गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजीची साइड ऑन शैली पाहताना विचित्र वाटते मात्र, त्यामुळेच तो क्रीझचा सुरेख वापर करुन फलंदाजांसमोर अडचणी निर्माण करतो. चेंडूची सिम ग्रीप करण्याची त्याची पद्धतच त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे. राउंड दी विकेट गोलंदाजी करतो तेव्हा तो दोन्ही स्विंग करु शकतो हीच त्याची अन्य गोलंदाजांपेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, असेही रज्जाकने सांगितले.