बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाज – सचिन तेंडुलकर

हैदराबाद  – आयपीएलच्या अंतिम सामन्यातील जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केले आहे. बुमराह त्याची अखेरची दोन षटके टाकण्यासाठी आला त्या आधीच्या षटकांत लसिथ मलिंगाने 20 धावा दिल्या होत्या. बुमरहाने त्याच्या वाटयाच्या चार षटकांमध्ये 14 धावा देत दोन गडी बाद केले. सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराह जगातला सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी अजूनही बाकी आहे असे मला वाटते अशा शब्दात सचिनने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक केले. सचिनहा मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक आहे.

यावेळी पुढे बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाला की, भिन्न गोलंदाजीची शैली असलेल्या बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत चेन्नईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले. मुंबईने चेन्नईवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला. त्यामध्ये बुमराहची अखेरच्या दोन षटकातील गोलंदाजी महत्वपूर्ण ठरली. तसेच सचिन पुढे म्हणाला की जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये होणारी विश्‍वचषक स्पर्धा भारताला जिंकायची असेल तर बुमराहला महत्वाची भूमिका बजावावी लागेल असे सचिनने म्हटले आहे.

तसेच मुंबईच्या संघातील नवोदित फिरकी गोलंदाज राहुल चहारचेही सचिनने कौतूक केले असून त्याच्या बद्दल बोलताना सचिन म्हणाला की, यंदाच्या मोसमात राहुल आपला पहिला सामना खेळण्यापुर्वीच मी महेला जयवर्धनेला बोलताना सांगितले होते की, हा गोलंदाज यंदा उत्कृष्ठ कामगिरी करेल आणि त्याने यंदाच्या मोसमात आपल्यातील कौशल्य दाखवून दिले आहे. अंतिम सामन्यात त्याने आपल्या चार षटकांमध्ये 13 चेंडू निर्धाव टाकत 14 धावा देत एक गडी बाद केला. त्याची ही कामगिरी खरच लाजवाब होती असेही सचिन यावेळी म्हणाला.

तसेच बुमराहचा संघातील सहकारी युवराज सिंगनेही त्यची स्तुती केली असून तो म्हणाला की, बुमराहने आपल्या पहिल्या दोन षटकांत अंबाती रायडूच्या विकेटसह फक्त सहा धावा दिल्या होत्या. बुमराहची गोलंदाजीची शैली वेगळी आहे. त्यामुळे काय गतीने चेंडू येणार आहे त्याचा फलंदाजालाही अंदाज बांधता येत नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here