भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्‍काबुक्‍की

पिंपरी – भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. ही घटना गुरुवारी (दि. 12) दुपारी साडेपाचच्या सुमारास आदिनाथ कॉलनी, रहाटणी येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सुदर्शन सुदाम सदाफुले (वय 41, रा. आदिनाथ कॉलनी, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यासह हेमा सुदर्शन सदाफुले (वय 31) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्यातील कर्मचारी जितेंद्र संजय उगले यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुदर्शन आणि आप्पासाहेब वाघेरे यांच्यामध्ये गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास भांडण सुरु होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी भांडण सोडविण्यासाठी वाकड पोलिसांनी मध्यस्थी केली. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने भांडणे करणाऱ्यांना समजावून सांगत असताना आरोपी सुदर्शन याने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

आरोपींनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली. गोंधळ घालून पोलिसांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. तसेच महिला पोलीस शिपाई गव्हाणे यांच्या अंगावर धावून जात हाताने मारहाण केली. फिर्यादी जितेंद्र यांनाही मारहाण केली. याबाबत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुदर्शन याला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपना देवतळे करीत आहेत.

 

घरात घुसून एकाला मारहाण
पिंपरी – घरात घुसून एकाला मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. 12) दुपारी वाघेरे चाळ, रहाटणी येथे घडला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन सुदाम सदाफुले (वय 41, रा. आदिनाथ कॉलनी, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विद्यासागर आप्पासाहेब वाघेरे (वय 49), आप्पासाहेब बंडुबा वाघेरे (वय 75), सुनंदा आप्पासाहेब वाघेरे (वय 70), राणी प्रल्हाद डोरगे (वय 19, सर्व रा. वाघेरे आळी, पिंपरीगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी सुदर्शन यांच्या घरात घुसले. आरोपी विद्यासागर याने इतर तीन आरोपींना सुदर्शन यांच्या घरातच थांबण्यास सांगितले. विद्यासागर याने सुदर्शन यांना घराच्या बाहेर नेऊन भिंतीवर ढकलून शिवीगाळ करत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×