माथाडींच्या बुरख्याआडून गुंडगिरी

सर्वसामान्य नागरिकांत दहशतीचे वातावरण


खंडणी, दमदाटी आणि तोडफोडीचे प्रकार


खऱ्या माथाडी कामगारांना फुकटचा त्रास

– संजय कडू

पुणे – शहरात माथाडी (हमाल) कामगारांचा बुरखा पांघरुण गुन्हेगारी हातपाय पसरत आहे. खंडणी उकळणे, दमदाटी करणे तसेच तोडफोड करणे असे प्रकार वाढत आहेत. तर शहरालगतच्या औद्यागिक क्षेत्रातही खून, खुनाचा प्रयत्न आणि गोळीबारासारखे प्रकार घडले आहेत. माथाडी कायद्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातच असे प्रकार घडत आहेत. गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या व्यक्तींकडून माथाडी संघटना स्थापन करुन असे प्रकार सर्रास केले जात आहेत. विशेष म्हणजे, संघटना स्थापनारे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संलग्न आहेत.

माथाडी संघटनेच्या नावाखाली एका व्यावसायिकाडून 80 हजार रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार नुकताच घडला. त्याच्याकडील कामगाराला चौथ्या मजल्यावरून फेकण्याची तसेच काम थांबविण्याची धमकी देऊन ही खंडणी उकळण्यात आली. तर, शहराच्या मध्य भागात पाच लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेने पकडले आहे. या ममधील आरोपी शाम राजू शिंदे (31,रा.अरण्येश्‍वर) याने 2017 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. तो भाजपप्रणित माथाडी संघटनेचा कार्यकर्ता आहे. याप्रकारे विविध माथाडी संघटनांमध्ये अनेक प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींचा भरणा आहे. शहरात मागील वर्षभरात माथाडींच्या नावाने खंडणीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. के.वेंकटेशम यांनीही याची गंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर माथाडी महामंडळ आणि “माथाडी’ नाव वापरत फोफावलेल्या संघटनांवर आळा घालणे आता पोलिसांसमोर आव्हान आहे.

असंघटीत कामगारांना संघटीत क्षेत्रातील कामगारांप्रमाणे सुविधा व सामाजिक सुरक्षा देणारा कायदा सरकारने 5 जून 1969 रोजी निर्माण केला. या कायद्याची 50 वर्षे यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. कायदा निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातच मात्र माथाडी कामगार काही संघटनांच्या खंडणीखोरीमुळे बदनाम होत आहे. माथाडी कामगार मंडळाचे कामकाज स्थानिक स्वराज्य संस्थेप्रमाणे चालते. मात्र, त्याचा अध्यक्ष व सचिव सरकारी अधिकारी असतात. माथाडी मंडळाचे अध्यक्ष म्हणून सहायक कामगार आयुक्त कामकाज पहातात. हे महामंडळ सरकारकडून एकही पैसा न घेता हमाली आणि लेव्हीच्या माध्यमातून कामगारांच्या कल्याणकारी योजना राबवते. पुण्यातील माथाडी महामंडळात सात ते आठ हजार कामगारांची नोंदणी आहे. हे सर्व कामगार कांदा, बटाटा, भुसार, टिंबर मार्केट, रेल्वे मालधक्का, एमआयडीसीतील कारखाने येथे कार्यरत आहेत. कामगाराने नोंदणी करताना त्याला एक कार्ड दिले जाते. तो कार्डवर तो जेथे काम करतो त्याची नोंद असते. यामुळे त्याला दुसरीकडे काम करता येत नाही. त्याला काम बदलायचे असेत तर तशी बोर्डाकडे परवानगी मागावी लागते. त्याचा पगारही बोर्डामार्फतच होतो. माथाडी महामंडाळाकडे कोणत्याही संघटनेची नोंदणी होत नाही. संघटनेची नोंदणी ही कामगार आयुक्तालयाकडे होते.

माथाडी संघटनेची नोंदणी कामगार आयुक्तालयाकडे केली जाते. या संघटनांना स्वत:च्या नावाचा वापर करुन काम मागण्याचा किंवा पावती फाडण्याचा अधिकार नाही. माथाडींच्या नावाने संघटना स्थापन करुन असे प्रकार करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करणे आवश्‍यक आहे.
– नितीन पवार, सामाजिक कार्यकर्ते.


माथाडी कामगार संघटनेच्या माध्यमातून घडलेले प्रकार लक्षात घेता अधिकृत कामगारांची यादी आम्ही पोलिसांकडे सोपवली आहे. यामुळे पोलिसांनाही कारवाई करताना संबंधित व्यक्ती अधिकृत, की अनधिकृत माथाडी कामगार आहे, याची कल्पना येईल. आमच्या मंडळाकडे नोंद झालेल्या सर्व कामगारांचा डेटाही संगणकावर उपलब्ध आहे.
– राजेंद्र भोसले, निरीक्षक, माथाडी महामंडळ, पुणे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)