मुंबई ( Bully App Case ) – बुली ऍप प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्याच्या प्रकरणात आणखी एकाला उत्तराखंडमधून अटक केली. त्याने या ऍपवर मुस्लीम महिलेचे आक्षेपार्ह बदल केलेले फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अपलोड केले होते. मयंक रावत (वय 21) असे या मुलाचे नाव आहे.
श्वेता सिंग (वय 18) आणि विशालकुमार झा (वय21) या दोघांना यापुर्वी अटक केली आहे. आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यासाठी हे तिघे अनेक ट्विटर अकाऊंटचा वापर करत असले, तरी ही टीम आणखी मोठी असण्याची शक्यता आहे.
श्वेता उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर शहरातील असून तिचे कुटूंब आर्थिक मागास वर्गातील आहे. तिला उत्तराखंडमधील उधमसिंगनगर येथून अटक करण्यात आली, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली. उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार म्हणाले, या प्रकरणातील तिच्या सहभागाच्या नेमक्या स्वरूपाबाबत आम्ही आताच काही सांगू शकणार नाही. मात्र हा गुन्हा करण्यासाठी तिने अनेक बनावट आयडी तयार केल्याचा तिच्यावर आरोप आहे. एका महिला पोलिसाला तिला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पथकासोबत पाठवले होते. एवढाच या कारवाईत उत्तराखंड पोलिसांचा सहभाग होता.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूतून विशालकुमारला अटक करण्यात आली. त्याला मुंबईत आणत असताना त्याने दिलेल्या माहितीवरून श्वेताला अटक करण्यात आली. विशालकुमारला सोमवारी उशीरा मुंबईत आणण्यात आले. विशाल आणि श्वेता यांची समाज माध्यमांतून मैत्री झाली होती. त्या दोघांनी मिळून हे ऍप तयार केले. त्यावर आक्षेपार्ह फोटो अपलोड करण्यासाठी चार ट्विटर अकाऊंटचा वापर केला जात होता. त्यातील तीन अकाऊंट श्वेता सांभाळत होती तर चौथे अकाऊंट विशाल सांभाळत होता.
हे ऍप अहिंदू चालवत आहेत, असे भासवण्यासाठी विशालकुमारने खालसा सुपरमेसिस्ट नावाने अकाऊंट तयार केले होते. हे अकाऊंट खरे वाटण्यासाठी त्यांनी ट्विटरवर काही शिख नावाने आणखी बनावट खाती तयार केली होती. ती सर्व खालसा सुपरमेसिस्ट या अकाऊंटला फॉलो करत होती. त्यांनी एका ट्विटर हॅंडलचे नाव बदलून जस्टीस फॉर शिख असे ठेवले होते.
दरम्यान त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे झालेल्या इन कॅमेरा सुनावणीत 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्याच्या घराची झडती घेण्यासही न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशाल बंगळुरूमधील एका प्रख्यात महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याच्या विभागप्रमुखांनी सांगितले की, सोमवारी काही लोकांचा गट महाविद्यालयाच्या आवारात आला. त्यांनी त्यांची ओळखपत्र दाखवून त्याची माहिती विचारत त्याच्यावरील आरोपांची माहिती दिली. त्याला फॅकल्टी रुममध्ये बोलवताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
विशाल कुमार हा सामान्य विद्यार्थी होता. तो मुळचा बिहारचा रहिवासी होता. त्याच्या अन्य कारवायांबाबत महाविद्यालयात फारशी कोणाला माहिती नव्हती. त्याची उपस्थिती सुमारे 60 टक्के असे. त्याच्या पालकांना त्याच्या अनुपस्थितीबाबत माहिती कळवण्यात आली होती. त्याला मुंबईला नेल्याचे आम्ही त्याच्या पालकांना कळवले आहे, असे विभागप्रमुखांनी सांगितले.