कलंदर: बु-लेट

उत्तम पिंगळे

रविवारी प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो तर जरा भिजलोच. पाऊस पडतच होता. प्राध्यापक चहा घेत होते त्यातलाच त्यांनी अर्धा मला दिला. आपल्या येथे सर्व पायात हळूहळू उथळ होत चालले आहे. त्यावर मी समजलो नाही असे म्हणताच ते म्हणाले. आता बघा मोठमोठ्या शिक्षणसंस्था निर्माण करताहेत; पण त्याचवेळी प्राथमिक शिक्षणाचे काय झाले आहे? अन्नधान्याचे भाव वाढत चालले आहेत त्याच वेळी सरकारी गोदामात किती तरी टन अन्न सडत जाते त्याचे काय? असे एक एक बोलत असताना गाडी पायाभूत सुविधांवर आली. देश विकसित करावयाचा असेल तर पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. यात वीज, पाणी, दळणवळणाची साधने, आरोग्य सोयी महत्त्वाच्या आहेत. आपण पुढे पाठ होत असतानाच मागे सपाट होत चाललेलो आहोत.

आता गेले चार-पाच दिवस सलग मुंबापुरी जलमय होत आहे. याचे कुणालाच काही पडलेले नाही. रस्त्याला पडणारे खड्डे व उघडी राहणारी मॅनहोल यामुळे किती अपघात होत असतात. दरडी पडत असल्याने मुंबई-पुणे जुना व एक्‍स्प्रेस हायवेही नेहमी बंद पडत असतो. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड येथे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी नियमित शिरताना आता दिसत आहे. मुंबईतील जुनी सांडपाणी व पाणी निस्सारणाची व्यवस्था तशीच आहे. सर्वत्र मोठमोठे टॉवर होत असताना पावसाचे अचानक पडणारे पाणी वाहून कसे जाणार याचा कोणी विचार करताना दिसत नाही. नव्या विमानतळाचा भराव होत असताना नवी मुंबईतील पावसाचे पाणी जाणार कसे याचा कोणी विचार करतोय का? कोकणासाठी सहा पदरी रस्ता करणार आहेत. पण कित्येक ठिकाणी रस्ता बंद पडलेला दिसत आहे. प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे याचा विचार कुणी करतोय का?

महालक्ष्मी एक्‍स्प्रेस शुक्रवारी रात्री मुंबईहून निघाली, बदलापूर-वांगणीदरम्यान बंद झाली. त्यातील प्रवाशांना रेल्वेकडून मदत मिळण्यास पंधरा-सोळा तासांचा अवधी लागला. एवढा गलथान कारभार आपल्याकडेच असू शकतो तसेच याची जबाबदारी कोणाची याचा कोणी विचार करताना दिसत नाही. सरकारी अधिकारी फोनवर बेपर्वाईने उत्तरे देत होते. हाच विकास मानावयाचा का? लोकल व शहरातील रोजचे दळणवळण जर आपण नीट सुधारू शकत नसू तर काय फायदा? घरातून बाहेर पडणारी व्यक्‍ती ऑफिस सुटल्यावर जर ट्रेन पकडत असेल तर त्याच्या मनात शंका नसली पाहिजे की, मी बरोबर सुखरूप पोहोचेन की नाही एवढी चोख व्यवस्था असावयास हवी. नैसर्गिक आपत्ती जरी सांगून येत नसेल तरी अशी आपत्ती आली असता तातडीने मदत नक्‍की मिळेल अशी खात्री असावयास हवी. सरकारला स्वतःच्या व्यवस्थेवर विश्‍वास नसल्याने, आवश्‍यकता नसेल तर कृपया बाहेर पडू नका असा सरकारच सल्ला देत आहे.

एवढे गोंधळ होत असताना आपण बुलेट ट्रेनच्या वार्ता करत आहोत. बुलेट ट्रेन थेट आकाशातून जाणार आहे की काय? त्या बुलेट ट्रेनपर्यंत तरी नीट पोचता यावे याचा तरी विचार करणार आहोत का? महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमधील सर्वांना शेवटी सरकारी संस्था व यंत्रणा तसेच लष्कराकडून मदत मिळाली पण कधी? पंधरा सोळा तासांनंतर. सरकारने यावर नक्‍कीच विचार करण्याची गरज आहे. नेहमीची रेल्वे व लोकल प्रथम सुरळीत, वेळेवर व सुरक्षित राहावी त्यात दिरंगाई नसावी. म्हणतात ना “भीक नको पण कुत्रं आवर’ तसेच “बुलेट नको पण लेट आवर’ असेच म्हणणे योग्य ठरेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.