बुलडाणा – राज्यात काही दिवसांपासून मुंबईसह ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे घर कोसळण्याच्या दुर्घटना घडत असून बुलडाण्यातही घराची भिंती कोसळून त्याखाली दबून एका 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर तीन गण गंभीर जखमी झाले आहे. ही दुर्घटना बुलडाण्यातील मेहकर तालुक्यात घडली.
बुलडाणा जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. तर काही घरांचे छप्पर उडून गेले आहेत. मेहकर तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने अंजनी बुद्रुक या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.
अंजनी बुद्रुक या ठिकाणी राहणारे मनवर खा मस्तान खा पठाण यांच्या घराची भिंत कोसळली. यावेळी त्यांची 3 वर्षाची चिमुकली आशिया पठाण त्याखाली दबली गेली. यात ती गंभीर जखमी झाली. अथक प्रयत्न करुन तिला बाहेर काढून उपचारासाठी औरंगाबाद येथे नेण्यात आले. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला. तर अन्य तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.