बुलढाणा : बुलढाणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी अरमाळ गावातील राज्य सरकारचा आदर्श युवा शेतकरी पुरस्कार मिळालेल्या एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या करण्याच्या अगोदर तीन पानांची सुसाईड नोट देखील लिहिली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ गावचे युवा शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. गेल्यावर्षी, 15 डिसेंबर 2024 रोजी यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील 14 गावांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळावं या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. मात्र त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नेहमीच प्रमाणे त्यांची आश्वासन देऊन बोळवण केली.
शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार, गेले तीन महिने कैलास नागरे यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळेल या आशेवर काढली. मात्र नेहमीप्रमाणे शासनाची आश्वासने हवेतच विरली आणि ऐन होळी सणाच्या दिवशी कैलास नागरे यांनी तीन पानांची सुसाईड नोट लिहत विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
सामूहिक आत्महत्येचा इशारा
जर शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी मिळालं नाही तर आम्ही सामूहिक आत्महत्या करू असा इशारा मृत शेतकरी कैलास नागरे यांच्या पत्नीने सरकारला दिला आहे. कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. तसेच ही आत्महत्या नसून सरकारने केलेला खून असल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.