उत्तरेकडील भागात जोरदार पावसाची शक्यता
पुणे – पूर्व-मध्य व लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर आता नवीन “बुलबुल’ चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळे उत्तरेकडील भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवर सोसायट्याचा वारा वाहणार असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. 7) राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, पावसाने हवामान विभागाला हुलकावणी दिली.
मागील 10 दिवसांपासून “महा’ चक्रीवादळामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला. गेल्या 24 तासांत पूर्व-मध्य व लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावरील “महा’ या तीव्र चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. मात्र, आता आणखीन एक “बुलबुल’ नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. त्याचा फटका आता कोणत्या शहरांना बसणार? त्यामुळे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील 24 तासांत गोव्यासह पूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. तर मराठवाड्यात हवामान कोरडे होते. सततच्या बदलत्या हवामानामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, “बुलबुल’ चक्रीवादळाचा प्रभाव उत्तर भागात पडण्याची शक्यता आहे, तर राज्यात हवामान कोरडे राहील, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
शहरात पावसाची विश्रांती
बुधवारी (दि. 6) संध्याकाळी पावसाचा शिडकाव सोडला तर, मागील चार दिवसांपासून वरुणराजाने शहरासह जिल्ह्यात विश्रांती घेतली आहे. गुरुवारी (दि. 7) मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. मात्र, पाऊसच गायब झाला आहे. दि. 8 रोजी शहरात हवामान ढगाळ राहील, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. तर पुढील दोन दिवस शहरातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.