नवी दिल्ली – ताजमहाल मंदिराच्या जागेवर बांधला गेला नसून, ताजमहालच्या तळघरांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती नसल्याचीही महत्त्वपूर्ण माहिती भारतीय पुरातत्व विभागाकडून देण्यात आली आहे. माहिती अधिकार ही माहिती देण्यात आली आहे.
ताजमहालच्या बंदखोल्यांमध्ये हिंदू देव-देवतांच्या खोल्या असल्याचा दावा हिंदू संघटनाकडून केला जात आहे. तसेच, शिवमंदिर पाडून ताजमहाल बांधण्यात आल्याचेही म्हटले जाते. यासंदर्भात तृणमूल कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मागवली होती. त्यांच्या आरटीआयला भारतीय पुरातत्व विभागाने सर्वेक्षण उत्तर दिलं आहे.
या माहिती अधिकारांतर्गत दोन प्रश्नांची माहिती मागवली होती. ताजमहालच्या जमिनीवर मंदिर नसल्याचा पुरावा आणि तळघरातील 20 खोल्यांमध्ये हिंदू देव-देवतांच्या मूर्ती असल्याचा पुरावा मागितला होता. मात्र, यावर भारतीय पुरातत्व विभागाने एका ओळीत उत्तर पाठवले आहे. साकेत गोखले यांनी फेसबूकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
भारतीय पुरातत्व विभागाने दिलेल्या या माहितीची दखल न्यायालय आणि जनतेने घ्यावी, असेही साकेत यांनी म्हटले आहे. तसेच, ताजमहालचा मुद्दा उपस्थित करून भाजप, हिंदुत्त्व गट यांच्याकडून तणाव निर्माण केला जात होता, त्यांचा हा मनसुबा आता खोडून काढला जाईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अयोध्येतील एका भाजप नेत्याने उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात तळघरे उघडण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळण्यात आली होती.