पुणे : आजकाल फोन वरून सर्वसामान्यांची फसवणूक करणारे अनेकजण तुम्ही पाहिले असणार मात्र चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून बांधकाम व्यायवसायिकाला धमकावण्यात आल्याचे समोर आले आहे. पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाला फोन करत त्याच्याकडे 20 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे.
पुण्यातून याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. किरण रामभाऊ काकडे, चैतन्य राजेंद्र काकडे, आकाश शरद निकाळजे, नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सौरभ नारायण काकडे आणि सुनिल ऊर्फ बाळा गौतम वाघमारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडे बोल्हाई येथील जागेचा एका वाद सुरू होता. आरोपींनी गुगल प्ले स्टोअरवरून फेक कॉल अॅप डाऊनलोड करून घेतले. त्यावरून अजित पवार यांचा मोबाइल क्रमांक वापरुन आरोपींनी बिल्डरला फोन लावला. यानंतर मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलत आहे. वाडे बोल्हाई शिरसाटवाडी येथील बाबा भाऊ चोरमले यांच्यासह हेक्टर जमिनीचा वाद मिटवून टाका. बिल्डरला गावात पाय ठेवू देणार नाही आणि तुमचे कोणतेही यापुढे प्रोजेक्ट होऊ देणार नाही अशी धमकी देऊन २० लाखांची मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे आरोपींना दोन लाख देण्यात आले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी बिल्डरने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर किरण रामभाऊ काकडे, चैतन्य राजेंद्र काकडे, आकाश शरद निकाळजे,नवनाथ भाऊसाहेब चोरमले,सौरभ नारायण काकडे आणि सुनिल ऊर्फ बाळा गौतम वाघमारे या सहा आरोपींना अटक करण्यात आली. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करीत आहेत.