बांधकामांना परवानगी आवश्‍यकच

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश

पुणे – जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होऊन बांधकामांना धोका होऊ शकतो. त्यामुळे अर्धवट स्थितीतील बांधकामे, ज्योत्याची आणि बेसमेंटची बांधकामे इत्यादींना मर्यादित स्वरुपात बांधकामाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी परवानगी दिली आहे.

सध्या अर्धवट असलेल्या बांधकामांमध्ये केलेल्या खोदकामात पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पर्यायाने रोगराई वाढू शकते. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत, छावणी परिषद पुणे, खडकी देहूरोड यांनी अतिबाधित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रात प्रकरणनिहाय परवानगी द्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

भूस्खलन प्रतिबंधक बांधकामे, अर्धवट स्थितीतील बेसमेंटच्या भरावांची कामे लॉकडाऊन आदेश अंमलात येण्यापूर्वी प्रत्यक्षात सुरू झालेली आजमितीला अत्यावश्‍यक असलेली जलरोधक कामे, राहत्या इमारतीमधील अपूर्ण अवस्थेतील प्लॅस्टर, प्लंबिंग इत्यादी स्वरुपाची दुरुस्ती कामांचा यामध्ये समावेश आहे. या कामांसाठी आवश्‍यक असलेली मालवाहतूक 17 एप्रिल 2020 रोजीच्या सूचनेनुसार नियम पाळून करता येईल. त्यासाठी वाहतूक परवाना व्यवस्था आणि तसेच बांधकामांसाठी आवश्‍यक कर्मचारी, यंत्रचालक, मजूर यांना एकवेळ कामाच्या ठिकाणी आणण्यासाठी वाहतूक परवाना देण्याची व्यवस्था महापालिका आयुक्‍त यांनी नियुक्‍त केलेल्या अधिकाऱ्यांकरवी करावी. महत्त्वाचे म्हणजे या कामासाठी लागणारे कामगार हे करोना प्रतिबंधित क्षेत्रातील नसावेत, याची दक्षता घ्यावी, असेही या आदेशात नमूद केले आहे.

कामगारांची काळजी घेणे बंधनकारक
कामगारांच्या राहण्याची, भोजनाची व्यवस्थाही कामाच्या ठिकाणी करावी. आठवड्यातून दोनवेळा त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. कामाच्या ठिकाणी गर्दी न करता डिस्टन्सिंगचे पालन करावे. आजारी कामगारासाठी विलगीकरण कक्षाची व्यवस्था करावी. मास्कचा वापर अनिवार्य. प्रवेशद्वार, सर्व दरवाज्याचे हॅन्डेल, पाण्याचे नळ, स्वच्छतागृह, अवजारे तसेच तात्पुरत्या स्वरुपात तयार केलेल्या निवारागृह ठराविक कालावधीनंतर 10 टक्‍के प्रमाणात सोडियम हॉयपोक्‍लोराइट असलेल्या निर्जंतुकीकरण द्रावणाने स्वच्छ करावेत. कामगारांना हात धुण्यासाठी साबण, हॅंडवॉश, पाणी आणि कामादरम्यान निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. बाहेरील व्यक्‍तींचा प्रवेश टाळण्यासाठी बॅरिकेड लावावेत. बांधकाम परवानगी प्रत आणि कामगारांच्या प्रवासाच्या परवानगीची प्रत स्थानीक पोलिसांकडे द्यावी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.