पुणे – जमिनीसंबंधी वादातून बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार यांच्यावर गोळीबार करत त्यांचा खून करण्यात आला. ही घटना ऑक्टोबरमध्ये पोलीस आयुक्तालयापासून काही अंतरावरच घडली होती. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व इतर संशयितांसह “बैठक’ करणाऱ्या चंदनगर ठाण्याच्या पोलीस हवालदाराच्या निलंबनाने आदेश काढण्यात आले आहेत.
परमेश्वर तुकाराम सोनके असे निलंबित हवालदाराचे नाव आहे. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एसबीआय प्रवेशद्वाराजवळ घडली. बावधन ब्रुद्रक येथील सर्व्हे. नं. 348 येथील जमिनीचा निकाल कानाबार यांच्या बाजूने लागणार असल्याचा अंदाज असल्याने आरोपींना हा गुन्हा केल्याचे विश्वास गंगावणे (वय 32, रा. येरवडा) यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
खुनासाठी राजेश साळुंके (वय 38, रा. सुखसागरनगर, कात्रज) याने मारेकऱ्याला पिस्तूल आणि काडतुसे पुरवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तो व त्याचा साथीदार राकेश बुरटे (वय 36, रा. जनता वसाहत, पर्वती. मूळ रत्नागिरी) हे खुनाचे मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्यासह सनी वाघमारे (वय 26, रा. वाघोली), रोहीत यादव (वय 19, रा. सुखसागरनगर), गणेश कुऱ्हे (वय 36), राहुल कांबळे (वय 36), रुपेश कांबळे (वय 38), हसमुख पटेल (वय 31) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी राजेश साळुंके, राकेश बुरटे, रोहीत यादव यांच्यासोबत पोलीस हवालदार परमेश्वर सोनके हा चंदननगर येथील एका हॉटेलमध्ये बैठकीस बसल्याचे सीसीटीव्हीच्या विश्लेषणावरून निष्पन्न झाले आहे. आरोपी आणि सोनके हे त्या ठिकाणी बसल्याबाबत साक्षीदारांकडून दुजोराही देण्यात आला. सर्वजण घटनेनंतर 5 ऑक्टोबरच्या रात्री 9.30 वाजता गप्पा मारत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ठपका काय?
परमेश्वर सोनके याच्या संपर्कात आरोपी आले असतानाही, त्याने आरोपींना पोलिसांसमोर हजर केले नाही. त्यांच्याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. सोनके याने आरोपींना मदत करण्याच्या हेतूने कृत्य केल्याने, पोलीस दलाची शिस्त मलीन केल्याने, दलाच्या शिस्तीस बाधा आणणारे, आरोपींना मदत करणारे असल्याने निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाने गैरवर्तन केल्याप्रकरणी परिमंडळ-4 च्या उपायुक्तांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.