दुबई – जगातील सर्वात उंच इमारत ‘बुर्ज खलिफा’चे बांधकाम करणाऱ्या अरबटेक या बांधकाम कंपनीने अधिकृतपणे दिवाळखोरी जाहीर केली आहे. आर्थिक परिस्थिती हाताळण्यापलिकडे बिघडली असल्याने या बांधकाम कंपनीच्या व्यवस्थापनाने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गल्फ न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये बांधकाम व्यवसायामध्ये खेळते भांडवल नसल्यामुळे अरबटेकच्या प्रकल्पांवर मोठा परिणाम झाला आहे. कोविड-18 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचाही फटका अरबटेकला खूप मोठ्या प्रमाणावर बसला आहे, असे अरबटेकचे अध्यक्ष वालिद अल मोकररब अल मुहैरी म्हणाले.
कायदेशीर आणि व्यवसायिक हक्क कायम ठेवल्यानंतर आणि कंपनीच्या आर्थिक स्थितीची फेरमांडणी केल्यानंतरही अरबटेक कंपनीची आर्थिक स्थिती सुस्थितीत आणली जाऊ शकत नाही. सध्याच्या स्थितीचा सामना करण्याची क्षमता अरबटेकमध्ये नाही, असेही मोकररब यांनी म्हटले आहे.
अरबटेक कंपनीच्या वस्तुस्थितीबाबत गेल्या काही दिवसांपासून नकारात्मक संकेत प्राप्त व्हायला लागले होते. कंपनीच्या भविष्याबाबत फारशी चांगली स्थिती नसल्याचे बोलले जाऊ लागले होते. त्याच पार्श्वभुमीवर कंपनीच्या अध्यक्षांनी कंपनी बंद करण्याची घोषणा केली आहे.
कंपनी विसर्जित करून सर्व भागधारकांना त्यांच्या देयके दिली जावीत, असा निर्णय घेण्यात आल्याचे व्यवस्थापनाने घेतला आहे. आता सर्व संबंधितांना जास्तीत जास्त परतावा कसा दिला जाऊ शकेल, या दृष्टीने निरवानिरवीची योजना तयार केली जात असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.