पुणे – ऑटोमोबाइल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि बांधकाम व्यावसायिक गौतम विश्वानंद पाषाणकर (वय 65) हे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून बेपत्ता झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली आहे.
पाषाणकर हे कृषी महाविद्यालयाजवळील मोदीबागेमध्ये राहतात. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ठिकाणी गेले होते. तेथून ते जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात आले.
त्यानंतर गौतम पाषाणकर गणेशखिंड रस्त्यावरील एलआयसी कार्यालयापर्यंत गेले. तेथून ते बेपत्ता झाले. नातेवाईकांनी आणि कर्मचाऱ्यांनी देखील अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. या प्रकरणी सध्या पोलिसात तक्रार दाखल केली.
तत्पूर्वी त्यांनी एक बंद लिफाफा त्यांच्या कारचालकाला घरी देण्यासाठी दिला होता. घरच्यांनी तो उघडल्यावर त्यात सुसाईड नोट आढळली. कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये आहे.
दरम्यान, तपासाचा वेग वाढवला असून विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.