मुंबई – राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल योजनांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आयआयटी (मुंबई), रिलायन्स फाउंडेशन आणि हुडको यांच्यामध्ये भागीदारी झाल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. राज्यात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार घरकुल डिझाईन करणे, कमी खर्चातील पण दर्जेदार अशा घरकुलाचे तंत्रज्ञान विकसीत करणे तसेच भूकंप, वादळ आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करू शकणाऱ्या घरकुलांची निर्मितीसाठी आयआयटी-मुंबई यांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आयआयटीच्या सहयोगातून ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आयआयटी ही देशातील अग्रगण्य आणि नामांकित संस्था असून त्यांच्या सहयोगातून ग्रामीण भागातील घरकुले अधिक दर्जेदार होण्यास मदत होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
“हाऊसिंग आणि अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ अर्थात “हुडको’यांच्याकडून ग्रामीण गृहनिर्माणासाठी तांत्रिक सहकार्य तसेच “सीएसआर’ आदी माध्यमातून आर्थिक सहकार्य घेण्यात येणार आहे.
घरकुलविषयक विविध योजनांची माहिती ऑडीओ, व्हीडीओ तसेच टेक्स्ट मेसेजद्वारा पोहोचविण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन सहकार्य करणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण घरकुल योजनांची माहिती देण्यासाठी हेल्पलाईनही तयार करण्यात येणार आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.