करोना रोखण्यासाठी उपाययोजना : पालकमंत्री-अधिकाऱ्यांची आढावा बैठक
मुंबईच्या आयुक्तांनी भरवली पुण्याची “शाळा’
पुणे – शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. महापालिकेच्या मदतीला आयएएस अधिकारी दिले. पण, तरीही शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड येथे मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे आदेश पवार यांनी शुक्रवारी दिले आहेत. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत यश आले आहे, तशाच उपाययोजना पुण्यात करा, अशा सूचना पवार यांनी दिल्या.
शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक पार पडली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार हे दर शुक्रवारी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागाचा आढावा घेतात. मागील आठवड्यात त्यांनी करोनाची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मुंबईमध्ये परिस्थिती कशी नियंत्रणात आणली, काय उपाययोजना राबविण्यात आल्या, याची माहिती जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना व्हावी. त्यानुसार उपाययोजना करण्यात यावी, यासाठी पवार यांनी मुंबई पालिकेचे आयुक्त चहल यांना पुण्यात आमंत्रित केले होते.
पुणे शहरासह जिल्ह्यात करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, तसेच संस्थात्मक क्वारंटाइन ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही पवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राम यांनी जिल्ह्यात करोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील करोनाबाधित, करोनामुक्त तसेच करोनासंसर्ग विषयक सद्यस्थिती, आरोग्य सुविधा आणि उपलब्ध सामग्रीबाबत माहिती दिली.
मुंबई पालिकेने केलेल्या उपाययोजना
– करोना चाचण्यांची संख्या वाढवली.
– बेडची उपलब्धता वाढवली.
– कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर
– खासगी डॉक्टरांची मदत
– डॉक्टरांच्या सेवांचे नियोजन
– रुग्णवाहिकांची उपलब्धता