मुलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करा…

माझ्या मुलाच्या मित्राच्या घरची हकिकत ऐकून मी चकीतच झाले होते. त्या मित्राच्या मुलाची आई सांगत होती की, तिचे मिस्टर बॅंकेत नोकरी असल्यामुळे त्यांची नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी बदली व्हायची. त्यामुळे मुलांना त्यांचा फार सहवास मिळाला नाही. मुलांची सगळी जबाबदारी आईवरच होती आणि तिनेही ती जबाबदारी छान सांभाळली. आता तीन महिन्यापूर्वी तिचे मिस्टर गेले आणि तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याम्चा मुलगा मोठा आणि मुलगी लहान. पण त्यांच्यात कुणी कुणाशी जास्त बोलत नाही भावा-बहिणीचं पटतच नाही खूप भांडण होते.

हे आपल्याला खूप घरात पाहायला मिळते. काही ठिकाणी आई-वडील दोघे हे कामाला असतात. त्यामुळे त्यांचा वेळ मुलांना मिळत नाही. त्यामुळे कधीकधी मुले आणि आई-वडील या नात्यात दुरावा निर्माण होतो. प्रत्येक नातं हे विश्‍वासावर अवलंबून असते. मुले-मुली जेव्हा वयात येतात त्यावेळी त्यांना खूप आई-वडिलांची गरज असते. त्यांना खूप काही सांगायचे असते. पण आज धावपळीच्या युगात पालकांना मुलांसाठी वेळच नसतो. त्यामुळे अनेक निराश मुलं आत्महत्या करताना दिसतात.

त्यांची समस्या हीच होती. मुलगी ऐकत नाही. तिच्या मनाचेच करते. त्यादिवशी तर बहिणीच्या काही चुकीच्या गोष्टी कळल्यामुळे भावाने तिला मारले. त्याचा तिला राग आला आणि ती घर सोडून चालली होती. या सगळ्या गोष्टींमुळे अर्थातच आई म्हणून त्या बाईंना त्रास होणारच. मुलांचे वडील असताना ते नेहमी बाहेर असल्यामुळे त्यांचे मुलांकडे लक्षच नव्हते. त्यामुळे आपण नक्की काय करायचे, हा प्रश्‍न त्यांना पडला होता.

यावर मी त्यांना समजावले आणि थोडा धीर दिला. त्यांच्या मुलीला बोलावून घेतले. आल्याबरोबरच तिने रडायला सुरुवात केली. तिला समजावले आणि धीर देत सांगितले, तू मला तुझी मैत्रिण समज आणि सगळं नीट सांग. आईसमोर ती बोलायला तयार नाही हे दिसत होतं. म्हणून मी त्यांना थोडं बाहेर जाण्यास सांगितले. मग मुलीने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तिचे हे म्हणणे होते की, आई आणि भाऊ दोघे माझ्याशी नीट बोलत नाहीत. आईचे फक्त दादावरच प्रेम आहे; ती त्याचेच ऐकते. माझे ऐकत नाही. त्यामुळे मी चुकत गेले आणि वाद सुरू झाले. मला मान्य आहे मी चुकले.

तिला नीट मी समजावले. पुढे येणाऱ्या धोक्‍यांची जाणीव करून दिली. त्यातून तीही बऱ्याच गोष्टी समजत होती आणि प्रॉमीस करत होती की, ती आता तसे वागणार नाही. “मी तुम्हाला विश्‍वास देते’ असे म्हणत ती माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडली. मी तिला शांत केले आणि तिच्या आईलाही काही गोष्टी सांगितल्या. आई-वडिलांनीच मुलांच्या चुका सांभाळून घेऊन मोठ्या मनाने त्यांना माफ करायचे. तुम्ही तिच्याशी एका मैत्रिणीसारखे वागा. तिच्या भावालाही खूप गोष्टी सांगितल्या. वातावरण आनंदी झाले त्या घरी गेल्या. ते सगळे छान एकत्र जेवायला गेले.

एक आई म्हणून मला एकच सांगायचे आहे. आई-वडिलांचे मुलांबरोबरचे नाते हे एक छान मैत्रीचे आदराचे असावे. त्या नात्यामध्ये विश्‍वास असावा. मुलांना भीती असावी पण ती आदरयुक्त असली पाहिजे; पण त्याबरोबर आई-वडिलांनीही मुलांना विश्‍वास ठेवला पाहिजे. त्यासाठी मुलांचे मित्र बना. मुलांमध्ये एक आत्मविश्‍वास निर्माण करा. त्यांनी तुम्हाला कोणतीही गोष्ट सांगताना भीती वाटायला नको, असे नाते निर्माण करा. त्यामुळे आपण आपल्या मुलांचे आधारस्तंभ झालो, तर त्यांना दुसरे आधार शोधण्याची गरज पडणार नाही. या नोकरीच्या गडबडीत आज आपण आपल्या मुलांना गमवणार नाही याची काळजी घ्या. मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

– भाग्यश्री साळुंके

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)