माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे आ. किरण लहामटे यांना आव्हान
अकोले (प्रतिनिधी) – तालुक्यात आजही 10 जागा पाणी अडविण्यासाठी असून, मी त्या जागा दाखवतो. विरोधकांनी एखादे धरण किंवा बंधारा बांधून दाखवावा, असे जाहीर आव्हान माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आ. डॉ. किरण लहामटे यांचे नाव न घेता दिले.
चाळीस वर्षांत मी काय केले, हे विरोधकांचे आरोप माजी मंत्री पिचड यांनी खोडताना, तालुक्यात पिंपळगाव खांड सारखे अनेक धरणे बांधून तालुका सुजलाम सुफलाम करून आज शेतकरी त्याच्या पायावर भक्कम उभा आहे. मात्र विरोधकांनी काय केले, त्याचे एक उदाहरण दाखवून द्यावे, असेही ते म्हणाले. मुळा व पठार भागाला वरदान ठरलेले पिंपळगाव खांड धरण हे ओव्हर फ्लो झाल्याने त्याचे जलपूजन पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री पिचड यांनी जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना कर्जाबाबत घेतलेल्या धाडसी निर्णयाचे स्वागत केले.
पत्रकारांशी बोलता माजी मंत्री पिचड म्हणाले, मी तालुक्यात 13 लघु व मध्यम दोन, अशा 15 जलाशयाची साखळी उभी केली. त्यामुळे शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी, उपसासिंचन योजना काही खासगी, सामुदायिक पाणीपुरवठा योजना यांच्यासाठी राज्य सरकार कडून निधीची उपलब्धता केली. त्यामुळे शेती शिवार हिरवे झाले. त्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबांत आमूलाग्र बदल झाला. हा बदल कसा झाला, हे विरोधकांनी पाहावे आणि मग विचारावे मी 40 वर्षांत काय केले ते. तुम्ही एक तरी धरण बांधून दाखवा, मी जागा दाखवतो. तुम्हाला जमत नसेल, तर मला सांगा. मात्र खोटे, बिनबुडाचे आरोप करू नका, असा सल्ला विरोधकांना दिला. यावेळी अगस्ती कारखान्याचे संचालक मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, प्रकाश मालुंजकर, बाळासाहेब ताजणे, राजेंद्र डावरे, अशोक देशमुख, सरपंच भाऊसाहेब शेटे, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अगस्तीचे कार्यकारी संचालक भास्कर घुले उपस्थित होते.