-विनोद मोहिते
इस्लामपूर – पिता-पुत्राचा वाद-विवादातून एका माथेफिरु तरुणाने वडिलांनी स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळलेल्या म्हैशीच्या डोक्यात लाकडी लोढणा मारत निष्पाप मुक्या प्राण्याला यमसदनी धाडले. घरगुती वादाचे पर्यवसान गाभण म्हैशीच्या दुर्दैवी मृत्यूने झाले. किल्लेमच्छिंद्रगड ( ता. वाळवा ) येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी सद्दाम झाकीर आगा याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
इस्लामपूर पोलीस ठाण्यात झाकीर यासीन आगा यांनी मुलाच्या विरोधात फिर्याद दिली. १२ मार्चच्या रात्री ८च्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किल्ले मच्छिंद्रगड ( ता.वाळवा, जिल्हा.सांगली) येथील झाकीर आगा व सद्दाम आगा या पिता-पुत्राचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर मुलगा सद्दाम याने वडिलांचा राग काढताना त्यांनी जीवापाड सांभाळलेल्या पंढरपूरी जातीच्या म्हैशीच्या डोक्यात लाकडी लोढणा मारला.
हा घाव वर्णी लागल्याने गाभण असणारी म्हैस ठार झाली. यात ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. पैशापेक्षा क्षुल्लक कारणावरून म्हैस ठार केल्याने विमनस्क अवस्थेत पोलीस ठाण्यात आलेल्या जन्मदात्या पित्याने मुला विरोधात फिर्याद दिली.
पोलिसांनी भारतीय दंड विधान – ४२९, ४२७, ५०४ या कलमान्वये इस्लामपूर पोलिसांत त्या माथेफिरु सद्दाम झाकीर आगा याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.