अंदाजपत्रकामध्ये वैद्यकीय उपकरणांच्या आयातीवर नाममात्र आरोग्य अधिभार लावण्यात आला आहे. देशांतर्गत वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य सेवांसाठी नवीन स्रोतांची निर्मिती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारत वैद्यकीय उपकरणांसाठी आयातीवरच अवलंबून होता. मात्र आता देशांतर्गत उपकरणांची निर्मिती केली जात आहेच. त्याशिवाय या उपकरणांची मोठ्या प्रमाणात निर्यातही केली जात आहे, असेही अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले.
देशातील सर्वांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे हे उद्दिष्ट साध्य झाले आहे. देशांतर्गत उद्योगाला चालना आणि आरोग्य सेवांमध्ये नवे स्रोत निर्माण करण्याच्या दुहेरी उद्देशासाठी वैद्यकीय उपकरणांच्या आयातीवर आयातशुल्काप्रमाणे नाममात्र आरोग्य अधिभार लावण्यात येणार आहे. या अधिभारातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग उदयोन्मुख जिल्ह्यांमधील आरोग्य सेवांसाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर खर्च केला जाणार आहे.