Budget decoded: केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2026) सादर झाला की सर्वत्र चर्चा सुरू होते ती ‘काय स्वस्त आणि काय महाग’ याची. मात्र, बजेट म्हणजे केवळ कर वाढवणे किंवा घटवणे नव्हे, तर तो सरकारच्या कमाईचा आणि खर्चाचा संपूर्ण आराखडा असतो. तुमच्या घराचा हप्ता (EMI), बचतीवरील व्याज आणि भविष्यातील नोकरीच्या संधी या सर्व गोष्टी या एका बजेटवर अवलंबून असतात. कमाई आणि कर्जाचे गणित: तुमच्या कर्जाच्या व्याजावर परिणाम- बजेटमध्ये सरकार आपली कमाई (टॅक्स, डिव्हिडंड इ.) आणि खर्च यांचा हिशोब मांडते. जर खर्च कमाईपेक्षा जास्त झाला, तर सरकारला कर्ज घ्यावे लागते. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा सरकार बाजारातून जास्त कर्ज उचलते, तेव्हा बँकांकडील पैसा कमी होतो आणि व्याजाचे दर वाढू लागतात. परिणाम: जर सरकारने जास्त कर्ज घेतले, तर तुमच्या घराचे किंवा कारचे कर्ज (Home/Car Loan) महाग होऊ शकते. मात्र, दुसरीकडे मुदत ठेव (FD) किंवा बाँड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त परतावा मिळण्याची शक्यता वाढते. nirmala sitharaman सरकारी खर्च: रस्ते, रेल्वे आणि तुमच्या नोकरीच्या संधी- सरकार दोन प्रकारे खर्च करते: महसुली खर्च (पगार, पेन्शन, सबसिडी) आणि भांडवली खर्च (रस्ते, रेल्वे, पूल बांधणे). महसुली खर्च: हा व्यवस्थापन चालवण्यासाठी गरजेचा असतो. भांडवली खर्च (Capital Expenditure): हा खर्च भविष्यासाठी महत्त्वाचा असतो. जेव्हा सरकार रस्ते किंवा पायाभूत सुविधांवर खर्च करते, तेव्हा सिमेंट, स्टील अशा अनेक उद्योगांना चालना मिळते आणि नवीन नोकऱ्या निर्माण होतात. वाहतूक स्वस्त झाल्यामुळे महागाई कमी होण्यासही मदत होते. टॅक्समधील बदल: तुमच्या खिशातील ‘जास्तीचा’ पैसा- बजेटमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘इन्कम टॅक्स’. कर रचनेत (Tax Slabs) होणारे छोटे बदलही मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मोठे ठरतात. जर टॅक्समध्ये सवलत मिळाली, तर लोकांच्या हातात खर्च करण्यासाठी जास्त पैसे उरतात. या पैशांचा वापर कुटुंब कर्ज फेडण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा बचतीसाठी करू शकते. कौशल्य विकास आणि भविष्यातील कमाई – आजचे बजेट केवळ आजचा विचार करत नाही, तर उद्याच्या पिढीसाठी काय संधी आहेत हेही ठरवते. शिक्षण, कौशल्य विकास (Skill Development) आणि खेळांवर होणारा खर्च तरुणांची कार्यक्षमता वाढवतो. जर बजेटमध्ये नवीन स्किल प्रोग्राम्ससाठी तरतूद असेल, तर भविष्यात उच्च पगाराच्या नोकऱ्या मिळणे सोपे होते, ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते. बजेटकडे पाहण्याचा ‘स्मार्ट’ दृष्टिकोन – तज्ज्ञांच्या मते, सामान्यांनी बजेटकडे केवळ ‘तात्पुरता फायदा’ म्हणून पाहू नये. बजेट हा देशाच्या धोरणांचा मार्गदर्शक नकाशा आहे. बचत आणि गुंतवणूक: बजेटमधील तरतुदी पाहून तुम्ही तुमची बचत कुठे गुंतवायची याचा निर्णय घेऊ शकता. धोरणात्मक आखणी: सरकारच्या खर्चाचा कल पाहून कोणत्या क्षेत्रात भविष्यात संधी निर्माण होतील, याचा अंदाज घेता येतो. थोडक्यात सांगायचे तर, बजेट हे तुमच्या घरगुती बजेटचा आरसा आहे. सरकार आपला पैसा कसा मॅनेज करते, यावरच तुमच्या घराची प्रगती आणि आर्थिक स्थैर्य अवलंबून असते.