बसप अध्यक्षा मायावतींना धक्का; स्मारक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून 7 ठिकाणी छापे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरील अवैध खाण प्रकरणानंतर आता बसपच्या अध्यक्षा मायावती या सत्तेत असताना झालेल्या 1400 कोटींच्या तथाकथित स्मारक घोटाळ्याप्रकरणी लखनऊमध्ये आज सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने सात ठिकाणी छापे मारले आहे. गोमती नगर आणि हजरतगंज भागात ईडीने धाडी टाकल्या आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये मायावती मुख्यमंत्रीपदी असताना स्मारके आणि उद्याने उभारताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. राज्यात विविध स्मारके स्मृतिउद्याने उभारण्यासाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदींच्या 34 टक्के म्हणजे तब्बल 1,400 कोटी रुपयांचा हा आर्थिक घोटाळा असल्याचा ठपका 2013 मध्ये लोकायुक्तांनी ठेवला होता. याप्रकरणी, 19 जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली तसेच भारतीय दंडविधान कायद्याच्या कलम 409 अन्वये प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्याची शिफारस लोकायुक्तांनी केली होती.

या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरु आहे. या प्रकरणात गुरुवारी ईडीने उत्तर प्रदेशमध्ये सहा ठिकाणी छापा टाकला. या कारवाईवर बसपाकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या कारवाईमुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्‍यता आहे.

काही दिवसांपूर्वी सीबीआयने अखिलेश यादव यांच्यावरही कारवाई केली होती. अवैध खाणकामाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालयाने एकाच दिवशी 13 खाणकाम प्रकल्पांना मंजुरी दिली आणि यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. ईडीनेही याप्रकरणी अखिलेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरु झाल्याचा आरोप दोन्ही पक्षांचे नेते करत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×