नीरा येथे बीएसएनएलचा कार्यभार जनरेटरवरच

वीजबिल थकल्याने महावितरणने केली बत्ती गूल

नीरा-नीरा (ता. पुरंदर) येथील बीएसएनएलने वीज बिलाची रक्कम गेल्या तीन महिन्यांपासून थकवल्याने मंगळवारी (दि.19) पासून महावितरणने बीएसएनएलची बत्ती गूल केली आहे. त्यामुळे या परिसरातील बीएसएनएलच्या मोबाईल, लॅंडलाईन ग्राहकांची सेवा ठप्प झाल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.

नीरा व परिसरात बीएसएनएलचे मोबाईल, इंटरनेट, लॅंडलाईनचे मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. परंतु त्यांना बीएसएनएलकडून अखंडीत सेवा मिळत नसल्यामुळे बीएसएनएलच्या कारभाराविषयी ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. दरम्यान, बीएसएनएलच्या इतर ठिकाणच्या कार्यालयातीलही सुमारे तीन महिन्यापासून वीजबिल भरले नाही. परंतु संबंधित ठिकाणच्या महावितरण कार्यालयाकडून ग्राहकांची गैरसोय होवू नये म्हणून बीएसएनएलचा विद्युत पुरवठा खंडित केला जात नाही. मात्र निरा येथील महावितरण कार्यालयाकडूनच बीएसएनएलचा कोणतीही सूचना न देता वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

वीज बिल न भरल्यामुळे महावितरणने मंगळवारी (दि.19) बीएसएनएलचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जनरेटरवर सेवा सुरु केली आहे. त्यामुळे पणजी, कोल्हापूर, पुणे हे बीएसएनएलचे महत्वाचे स्टेशन असलेले 10 ओएफसीची मेन सिस्टीम चालू ठेवली आहे. बॅंकांचे लीज लॅंडलाईन, ब्रॉडबॅंड चालू ठेवले असल्याने बॅंकांचे व्यवहार व मोठ्या शहराशी संपर्क चालू ठेवला आहे. मात्र नीरा व परिसरातील मोबाईल व लॅंडलाईन सुविधा बंद झाल्या आहेत, असे निरा येथील बीएसएनएलचे सहाय्यक अभियंता सुरेश भगत यांनी सांगितले.

 • बीएसएनएलकडे महावितरणचे सुमारे तीन महिन्यांचे वीज बिल थकबाकी असल्याने ते न भरल्याने मंगळवारी ( दि.19) दुपारी बीएसएनएल चा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
  -मनोज पाटील, शाखा अभियंता, महावितरण, निरा
 • सध्या बीएसएनएल आर्थिक संकटात सापडले
  असल्याने वीज बिल भरण्यास विलंब होत आहे. राज्यातील सर्व केंद्राच्या वीज बिलांची रक्कम दिल्ली येथील कार्यालयाकडून दिली जात असून त्यासाठी सतत दिल्ली कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु आहे.
  -अनिल भालेराव, उपव्यवस्थापक, बीएसएनएल, पुणे ग्रामीण विभाग, पुणे
 • बीएसएनएलने व महावितरण ह्या दोन्ही शासकीय खाती आहेत . त्यामुळे दोन्हीही खात्यांनी ग्राहकांची गैरसोय होऊ नये या करिता प्रयत्न करावेत. ग्राहकांना अखंडित सेवा द्यावी.
  – अशोक रणदिवे, बीएसएनएलचे ग्राहक

Leave A Reply

Your email address will not be published.