भारतीय जवानाची हत्या गैरसमजातून…

पाचावर धारण बसलेल्या बांगलादेशच्या गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

ढाका : बांगलादेशी सैनिकाने भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाची हत्या आणि दुसरा जखमी करणे हे कृत्य गैरसमजातून घडले आहे, याबाबत वेळ पडल्यास भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याची गरज आहे, असे स्पष्टीकरण बांगलादेशचे गृहमंत्री असादुझ्झमान खान यांनी ही घटना घडल्यावर दोन दिवसांनी दिले.

पीटीआयने दिलेल्या वृत्तनुसार, सीमेवरील ध्वज बैठकीवेळी बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या एका सैनिकाने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे जवान विजयभान सिंग (रा. उत्तर प्रदेश) हे शहीद झाले. तर राजवीर यादव हे जवान जखमी झाले. भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांच्या मच्छीमारांना सोडवण्यासाठी बेकायदा घुसखोरी केल्यामुळे हे कृत्य घडले, अशी भूमिका बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती. स्व संरक्षणार्थ हा गोळीबार केल्याचा दावा केला होता. मात्र, हा गोळीबार अनावश्‍यक होता. भारतीय बाजूने त्याला प्रत्त्युत्तर दिले नाही, असे भारतीय सीमा सुरक्षा दलाने त्यावर स्पष्ट केले होते.

प. बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात पद्मा नदीत तीन मच्छिमार भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या परवानगीने मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यांना बांगलादेशी सैनिकांनी ताब्यात घेतले. त्यापैकी दोघांची सुटका केली. तर एकाला अटक केली. हाच विषय दोन्ही देशाच्या लष्कराच्या ध्वजबैठकीत सुरू होता. त्या तिसऱ्या मच्छिमाराची सुटका करण्यात येईल, असेही बांगलादेशच्या गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.

या घटनेची भारतीय सुरक्षा दलांनी गंभीर दखल घेतली होती. वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. हा प्रकार प्रक्षोभक असल्याची भूमिका भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली होती. सीमा सुरक्षा दलाचे व्ही. के. जोहरी यांनी बांगलादेशचे मेजर जनरल शफीनुल इस्लाम यांच्याशी हॉटलाईनवर संपर्क साधून आपल्या तीव्र भावना नोंदवल्या होत्या.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.