नवी दिल्ली – भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी शनिवारी पंजाबमध्ये सीमेलगत पाकिस्तानी तस्करांचा डाव उधळला. जवानांच्या धास्तीने तस्करांनी माघारी पाकिस्तानी हद्दीत पलायन केले. त्यानंतर जवानांनी शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांचा साठा जप्त केला.
पंजाबमध्ये गुरदासपूर क्षेत्रात सीमेलगत तैनात असणाऱ्या बीएसएफ जवानांनी पहाटेच्या सुमारास संशयास्पद हालचाली हेरल्या. सशस्त्र तस्करांचा गट परिसरात असल्याचे जवानांच्या ध्यानात आले. जवानांनी आव्हान दिल्यावर तस्करांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे घाबरलेल्या तस्करांनी धुक्याचा फायदा उठवून माघारी पलायन केले.
चकमक समाप्त झाल्यानंतर काही काळाने जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवली. त्या मोहिमवेळी दोन पिस्तुल आणि इतर शस्त्रास्त्रांचा साठा सापडला. त्याशिवाय, अंमली पदार्थाची काही पाकिटेही जप्त करण्यात आली. त्या पाकिटांमध्ये हेरॉईन असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित घडामोडीनंतर बीएसएफने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला.
त्यानंतर पोलिसांनी पाकिस्तानातून तस्करीमार्गे कुणाला साठा पाठवण्यात आला याचा छडा लावण्यासाठी तपास सुरू केला आहे.