बांगलादेशी सैनिकाच्या गोळीबारात “बीएसएफ’चा जवान शहिद

मच्छिमारांशी संबंधित समस्येचे निराकरण करायला गेलेल्या जवानावर गोळीबार
कोलकाता/ ढाका – गुरुवारी बांगलादेशी सैनिकाने गोळीबार केल्यामुळे सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला आणि आणखी एक जखमी झाला. पश्‍चिम बंगालमधील दोन देशांची आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेल्या ध्वजबैठकीत बांगलादेशी सैनिकाने “एके-47′ रायफलमधून गोळीबार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या (बीजीबी) सैन्याच्या या आगळीकीमुळे दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाला असून “बीएसएफ’चे प्रमुख व्ही के. जौहरी यांनी आपला समकक्ष मेजर जनरल शफीनुल इस्लाम यांच्याशी हॉटलाईनवरून संपर्क साधला. “बीजीबी’ महासंचालकांनी या घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे जौहरी म्हणाले.

उच्च पातळीवर दखल…
दोन्ही दलांमधील संबंध अतिशय सौहार्दपूर्ण आहेत आणि अनेक दशकांपर्यत त्यांच्यात एकही गोळी झाडली गेली नाही. आज घडलेली ही घटना अपवादात्मक असून परिस्थिती बिघडू नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. “बीएसएफ’ने याबाबत केंद्रीय गृह मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला माहिती दिली असून याबाबत दिल्लीतील सुरक्षेशी संबंधित वरिष्ठ पातळीवरही दखल घेतली गेली आहे.

ही घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बीएसएफच्या काकमारिचर सीमा चौकीच्या हद्दीत घडली. भारतीय मच्छिमारांशी संबंधित एखादा प्रश्न सोडवण्यासाठी “फोर्स पार्टी’ पद्मा नदीच्या मध्यभागी चार किंवा नदीकाठी उभे असलेल्या “बीजीबी’ कर्मचाऱ्यांकडे गेले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नदीत हिलसा मासे मोठ्या प्रमाणावर मिळतात. मासेमारीसाठी दोघा मच्छिमारांना “बीजीबी’ने परवानगी दिली आणि तिसऱ्या व्यक्‍तीस मात्र पकडल्याचे “बीएसएफ’ला कळवले. त्यावर या समस्येचे निराकरण करण्यासाठी 117 व्या बटालियनचा “बीएसएफ’ पोस्ट कमांडर, एक उपनिरीक्षक, मोटर बोटवर सहा सदस्यांची पार्टी घेऊन घटनास्थळी गेले.

तेथून मोटरबोटकडे परतत असताना बांगलादेशी सैनिकाने “बीएसएफ’चे हेड कॉन्स्टेबल विजय भान सिंग यांच्या डोक्‍यात गोळी मारली, तर कॉन्स्टेबल राजवीर यादव यांच्या हाताला गोळी लागून ते जखमी झाले. “बीएसएफ’ जवान बोटीमध्येच मरण पावला आणि जखमी हवालदार यादवने चतुराईने नौका बुडण्यापासून वाचवली आणि ती सुरक्षितपणे भारतीय बाजूने आणली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर 4,096 कि.मी. लांबीच्या भारत-बांगला सीमेवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.