बीएसएफने सीमेलगत उधळला घुसखोरीचा डाव

जम्मू-काश्‍मीरमधील घटना

जम्मू – भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) मंगळवारी आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगत दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. जम्मू-काश्‍मीरच्या सांबा जिल्ह्यात बीएसएफच्या जवानांना घाबरून पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी माघारी पाकिस्तानी हद्दीत धूम ठोकली.

सोमवारची मध्यरात्र उलटल्यानंतर दहशतवाद्यांच्या एका गटाने सांबा क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हालचाली बीएसएफच्या सतर्क जवानांनी तातडीने हेरल्या. दहशतवाद्यांना थांबण्याचा इशारा जवानांकडून देण्यात आला. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे घाबरून दहशतवाद्यांनी माघारी पलायन केले.

जवानांच्या सतर्कतेमुळे दहशतवादी सीमा ओलांडून भारतीय हद्दीत शिरकाव करू शकले नाहीत. मात्र, पाकिस्तान रेंजर्सच्या मदतीमुळेच संबंधित दहशतवादी संबंधित ठिकाणापर्यंत पोहचू शकल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे बीएसएफने तातडीने पाकिस्तान रेंजर्सशी संपर्क साधत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध केला. पाकिस्तान रेंजर्स हे शेजारी देशाचे सीमा सुरक्षा दल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.