नवी दिल्ली :- पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगत अवघ्या २४ तासांत ४ पाकिस्तानी ड्रोन जप्त करण्यात आले. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची ड्रोनजप्ती दुपटीवर गेली. त्यातून पाकिस्तानी कुरापतींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानी आगळिकी हाणून पाडण्यासाठी पंजाब सीमेलगत भारतीय सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) करडी नजर ठेऊन आहे. पाकिस्तानी तस्करांकडून पंजाबमध्ये अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे पाठवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. बीएसएफचे सतर्क जवान वेळीच हालचाली करून संबंधित ड्रोनवर मारा करून ते पाडतात.
चालू वर्षात तशाप्रकारचे २०० हून अधिक ड्रोन जप्त करण्यात आले आहेत. मागील वर्षी (२०२३) बीएसएफने १०७ ड्रोन जप्त केले होते. त्या आकडेवारीमुळे नापाक कुरापती वाढल्याचे स्पष्ट होत आहे. अर्थात, बीएसएफकडून त्या कुरापती हाणून पाडल्या जात आहेत.
Maharashtra Assembly Election 2024 : मविआचा जाहीरनामा म्हणजे आमची कॉपीपेस्ट – सुधीर मुनगंटीवार
भारतीय आणि विशेषत: पंजाबमधील तरूणांना अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या जाळ्यात अडकवणे, देशविघातक घटकांना शस्त्रास्त्रे पुरवून सामाजिक सलोखा बिघडवणे या नापाक मनसुब्यांतून तस्करीचे प्रयत्न होत आहेत. त्यामागे भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा कुटील डाव असल्याचे दडून राहिलेले नाही.