शिवमोग्गा – कर्नाटक भाजपचे प्रबळ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आपण निवडणूकीच्या राजकारणापासून दूर राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी शुक्रवारी सांगितले की माझ्या ऐवजी आपले पूत्र बी वाय विजयेंद्र 2023 ची विधानसभा निवडणूक त्यांच्या शिकारीपुरा मतदारसंघातून लढवणार आहेत.
आगामी निवडणूक मी लढवणार नाही, विजयेंद्र शिकारीपुरामधून निवडणूक लढवणार आहे. मी शिकारीपुरातील लोकांना माझ्यापेक्षा मोठ्या फरकाने विजयेंद्र यांना विजयी करण्यासाठी प्रार्थना करतो असे आज येडियुरप्पा यांनी नमूद केले.
विजयेंद्र यांची जुलै 2020 मध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2019 आणि 2020 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे केआर पेट आणि सिरा विधानसभा विभागात भाजपच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल अनेकांनी विजयेंद्र यांना श्रेय दिल्याने त्यांचे पक्षातील वजन वाढले आहे.