येडियुरप्पा म्हणतात पाकिस्तानवरील हल्ल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या पथ्यावर  

कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बीएस येडियुरप्पा यांनी काल केलेल्या एका वक्तव्यावरून त्यांच्यावर सध्या देशभरातून जोरदार टीका होताना दिसत आहे. येडियुरप्पा यांनी काल चित्रदुर्गा येथे एका सभेमध्ये बोलताना म्हंटले होते की, “दिवसेंदिवस देशातील राजकीय वातावरण भाजपच्या बाजूने झुकताना दिसत आहे. मंगळवारी पहाटे भारताने पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर जोरदार हवाई हल्ला केल्याने आता देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची मोठी लाट आली आहे. आता या मोदी लाटेमुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात जनमत मिळणार आहे.

पाकिस्तानी लढाऊ विमानांना भारतीय वायुसेनेने पिटाळून लावल्याच्या वृत्तावर ते म्हणाले होते, “आताच हाती आलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना भारतीय वायुसेनेने पिटाळून लावलं आहे. याचा फायदा नक्कीच कर्नाटक भाजपला होईल. मोदी यांनी जे ४० वर्षात घडलं नाही ते घडवून आणल्याने आपण कर्नाटकात लोकसभेच्या २२ जागा जिंकु”

येडियुरप्पा यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकांचा पाऊस पाडला आहे. येडियुरप्पांच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री वी के सिंग यांनी देखील त्यांना चांगलेच सुनावले आहे. वी के सिंग यांनी सरकारची ही कारवाई निवडणुकांमध्ये जागा जिंकण्यासाठी नाहीतर नागरिकांच्या सौरक्षणाच्या दृष्टीने केल्याचे म्हंटले आहे.

दरम्यान आज आपल्या वक्तव्यावरून चोहीबाजूने घेरले गेल्याने येडियुरप्पा यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.