1 एप्रिलपासून इंधनाचा पुरवठा अपेक्षित : इंडियन ऑइल कंपनीकडून वितरण
पुणे – इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ठरवून दिलेल्या वेळेच्या अगोदरच म्हणजे 22 मार्चपासून बीएस- 6 या शुद्ध इंधनाचा पुरवठा सुरू केला आहे. वेळापत्रकानुसार 1 एप्रिलपासून या इंधनाचा पुरवठा करणे अपेक्षित होते.
मात्र, आम्ही लवकरच तयारी केली असून पुण्यासह देशभरातील पेट्रोल पंपावर या शुद्ध इंधनाचा पुरवठा सुरू झाला असल्याचे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या इंधनामधील सल्फरचे प्रमाण अत्यल्प असते. देशातील वाहनाचे उत्सर्जन कमी करण्यासाठी 1 एप्रिलपासून फक्त बीएस-6 प्रकाराची वाहने विकली जाणार आहेत. या वाहनांसाठी आवश्यक असे इंधन तयार करण्याचे काम भारतातील तेल कंपन्यांनी दोन वर्षांपासून सुरू केले आहे.
यासाठी जवळजवळ 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक विविध तेल कंपन्यांनी केली आहे. याच आठवड्यामध्ये भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम तेल कंपन्या शुद्ध इंधनाचा पुरवठा सुरू करणार आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या सर्व तेल शुद्धीकरण कारखान्यातून अशाप्रकारचे इंधन तयार करण्याचे काम चालू झाले आहे. त्यामुळे वाहनातून होणाऱ्या उत्सर्जनाचे प्रमाण अत्यल्प होणार आहे.