पुणे : शिक्रापूर परिसरात संपूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले असून प्रेमसंबंधास विरोध केल्याने एका महिलेने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासोबत तीनजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी अग्नेल जॉय कसबे (वय २३, रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी ), सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय ४३, गुड विल वृंदावन सोसायटी, वडगाव शेरी) आणि एका अल्पवयीन मुलीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. जॉन्सन कॅजिटन लोबो (वय ४५, रा. वडगाव शेरी) हे खून झालेल्याचे नाव आहे. आरोपीना तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
अग्नेल याचे आरोपी सॅन्ड्रा हिच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. तिचे वडील जॉन्सन याचा प्रेमसंबधाला विरोध होता. या कारणावरुन त्यांच्यात वादावादी व्हायची. भांडणाला वैतागून आरोपी महिला आणि तिच्या मुलीने जॉन्सन यांचा खून करण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी समाजमाध्यमातील वेगवेगळ्या गुन्हेगारी विषयक मालिका पाहिल्या. त्यानंतर ३० मे रोजी मध्यरात्री जॉन्सन घरात गाढ झोपले होते.
तेव्हा आरोपींनी त्यांच्या डोक्यात वरवंटा घातला, तसेच त्यांच्या मानेवर चाकूने वार करून निर्घृण खून केला. त्यानंतर एक दिवस त्यांनी त्याचा मृतदेह घरातच ठेवला. दुसऱ्या दिवशी मृतदेह मोटारीतून नगर रस्त्यावरील सणसवाडी परिसरात मोकळ्या मैदानात पेट्रोल टाकून जाळून टाकला होता.