इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये आता बलात्काराच्या शिक्षेसाठी एका अघोरी शिक्षेला मान्यता देण्यात आली आहे. बलात्कार करणाऱ्या दोषी व्यक्तीचे रासायनिक पद्धतीने निर्बिजीकरण केले जाणार आहे. तसेच सराईत गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूदही या बलात्कार विरोधी कठोर कायद्यात केली जाणार आहे.
लैंगिक गुन्ह्यातील प्रकरणांची सुनावणी “फास्ट ट्रॅक’ न्यायालयात केली जाणार आहे, असे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बलात्काराची व्याख्याही बदलली गेली.
याच बैठकीमध्ये कायदा मंत्र्यांनी बलात्कार विरोधी अध्यादेशाचा प्रारुप आराखडा सादर केला, असे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. मात्र अद्याप याची अधिकृत घोषणा केली गेलेली नाही.
पाकिस्तानमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून तपास, फास्ट ट्रॅक सुनावणी आणि साक्षीदारांना संरक्षण या बाबींवरदेखील या प्रस्तावित अध्यादेशाच्या आराखड्यत भर दिला गेलेला आहे. या कडक् उपय योजनांना विलंब करणे खपवून घेतले जाणार नाही, असेही इम्रान खान यांनी म्हटल्याचे वृत्त संबंधित वृत्तवाहिनीने दिले आहे.
हा कायदा लवकरच संसदेत सादर केला जाईल, असे सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफचे खासदार फैसल जावेद खान यांनी ट्विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आठवड्याभरात या अध्यादेशाला अंतिम स्वरुप दिले जाईल, असे देशाचे माहिती मंत्री शिबली फराज यांनी सांगितले.