प्रकल्पाने मूळ रस्त्याची 55 ते 60 टक्के जागा व्यापली
कोट्यवधी रुपये खर्च करूनही मार्गाची दुरवस्थाच
वाहतूक कोंडीची समस्या “जैसे थे’
पुणे – शहरांतील विविध भागांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या बीआरटी मार्गांची स्थिती “असून अडचण, नसून खोळंबा’ अशी आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 55 ते 60 टक्के जागा व्यापली जात असतानाही बसेसची संख्या जास्त नसल्याने, स्वतंत्र बीआरटी लेन असूनही वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटीसह नगररस्ता, संगमवाडी, येरवडा परिसरातील काही बीआरटी मार्गांची दुरवस्था झाली आहे. बीआरटीसाठी असणारे सिग्नल बंद आहेत. तर काही ठिकाणी बुम बॅरिअरऐवजी साध्या दोरीचा वापर होत आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बंद बीआरटी मार्गातून सर्व वाहनांना प्रवेश देण्यात येत होता. त्यावेळी वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली होती. मात्र, प्रशासनाने पुन्हा बसथांब्यांचे काम सुरू केल्याने मार्ग ब्लॉक होत आहे.
बीआरटीच्या या दुरवस्थेमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. केवळ वाहनांच्या धडकेमुळे होणाऱ्या अपघातांसह रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांचे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. तुटलेले रेलिंग, चुकीचे बसथांबे, चुकीची वळणे, मेट्रोचे काम, बॅरिकेडींग नसणे आदींमुळे अपघाताचा धोका वाढत आहे. स्वारगेट ते कात्रज या मार्गावरील बीआरटी मार्गाव पुन्हा काम सुरू केले आहे.
या कामाने पुन्हा वेग घेत असला, तरी या मार्गावरून बस सोडून अन्य वाहने धावत आहेत. बीआरटी मार्गासह मुख्य चौकांमध्ये वाहन चालविणे किंवा रस्ता ओलांडणे जिकीरीचे होत आहे. यासह या मार्गावर वाहन चालविताना सजगता बाळगावी लागते, असे स्थानिक सांगतात.
पुणे सातारा रस्त्याप्रमाणे नगररस्ता आणि येरवडा मार्गावरील बीआरटीची अवस्था बिकट आहे. विश्रांतवाडी, पर्णकुटी चौक, गुंजन चौक, शास्त्रीनगर, विमाननगर या मार्गावरील बीआरटीमध्ये मेट्रोच्या कामामुळे अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी बीआरटीच्या मार्गाची वाहतूक सुरळीत होण्याऐवजी वाहतूक कोंडीमध्ये भर पडते.
विशेषत: सातारा रस्त्यावरील बीआरटीचा फज्जा
पुणे-सातारा रस्त्यावर मागील पाच वर्षांपूर्वी नवा कोरा बीआरटी मार्ग उभारला. मात्र, या मार्गातून “बीआरटी’साठी मागविलेल्या विशेष बसेस धावण्याऐवजी पीएमपीच्या जुन्या बसेस देखील धावत होत्या. बसच्या डाव्या बाजूच्या दारातून चढता-उतरता येईल, असे बसस्टॉप या मार्गावर उभारले होते. परंतु, दोन वर्षांपूर्वी पुन्हा या मार्गाची फेररचना केली. याची पुनर्रावृत्ती मागील काही महिन्यांपासून होत असून, स्वारगेट-कात्रज मार्गाच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे.