कोल्हापूर – गुढी पाडव्याच्या मुर्हुतावर शाहू मार्केट यार्डात गुळ बाजारात झालेल्या मुहूर्ताच्या सौद्यात 3200 ते 5100 असा प्रती क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीचे सभापती बाबासो लाड यांच्या हस्ते सौदे काढण्यात आले हे सौदे गुरुदत्त ट्रेडर्स यांच्या अडत दुकानात झाले.
यंदाच्या गुळ हंगामात जवळपास 25 लाख गुळ रव्यांचे सौदे झाले आहेत. नव्याने गुळ या बाजारपेठेत येत आहेत. अशात लहान गुळाला सर्वाधिक मागणी असल्याने एक किलो – दोन किलोचे गुळ रवे बाजारात येत आहेत. तसेच परंपरागत दहा किलो ते तीस किलोपर्यंतचे गुळ रवे बाजारात येतात. या गुळाला गुजरातमधून सर्वाधिक मागणी आहे. गेल्या कांही वर्षात अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुऱ्हाळ घरे बंद होत आहेत. यात गेल्या दहा वर्षात गुळाचे भावही कमी आले. त्यामुळे अनेक गुऱ्हाळ घरे बंद झाली. मात्र गेल्या दोन वर्षापासून गुळाला चांगला भाव मिळत असल्याने गुळाच्या आवकेत वाढ होतानाही पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या परंपरंनुसार बाजार समितीमध्ये आज पाडवा मुर्हुतावर गुळ सौदे झाले. यात 3 हजार 200 ते 5 हजार 100 असा भाव मिळाला हा भाव हंगामाच्या अखेरपर्यंत टिकून रहाण्यासाठी चांगल्या प्रतीचा गुळ बाजारात येणे महत्वाचे आहे. आज च्या सौदयाला गुळाला चांगला भाव मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया गुळ उत्पादकांनी व्यक्त केल्या आहेत.