लातूर – प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत मिळणारा दोन हजार रुपयांचा हप्ता पत्नीला दिल्याच्या कारणावरून दोन भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात नागनाथ सुडके यांनी त्यांचा भाऊ वैजनाथ सुडके यांच्या डोक्यात काठीने वार करून जखमी केले.
उपचारादरम्यान वैजनाथ यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना लातूर तालुक्यातील कासार जवळा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नागनाथ सुडके याला अटक केली आहे.
मयत वैजनाथ यांचे मामाने दिलेल्या फिर्यादीवरून गातेगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच बारा तासाच्या आत गातेगाव पोलीसांनी आरोपीच्या शोधात दोन पथके पाठवून त्याला अटक केली. पुढील तपास गातेगाव पोलीस करत आहेत.