पुणे अग्निशमन दलाची 16 कोटींची ब्रांटो !

पुणे : पुणे अग्निशमन दलाकडे अपघात तसेच आगीच्या घटनांना हाताळण्यासाठी विविध प्रकारची वाहने आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जर्मन टेक्नॉलॉजीची अद्ययावत यंत्रणा असलेली ब्रांटो(हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म्स).

एखाद्या उंच इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या बचावकार्यासाठी, तसेच उंच इमारतीत लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी  ब्रांटो (हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म्स) आहेत. पुणे अग्निशमन दलाकडे अशा प्रकारची ३ वाहने आहेत. त्यामध्ये 42 मीटरच्या 2 आणि 70 मीटरची 1 अशा वाहनांचा समावेश आहे. 100 मीटर किंवा त्यापेक्षा उंच असलेल्या इमारतींमध्ये लागलेली आग याद्वारे सहज वीझवता येते.

सिरम इन्स्टिट्यूटमधील आगीची घटना 

नुकतीच सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जी आगीची दुर्घटना घडली त्यामध्ये वरच्या मजल्यावर लागली होती. हि आग मोठी असल्यामुळे त्याठिकाणी ब्रांटो (हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म्स) ची मागणी करण्यात आली होती. त्याठिकाणी ब्रांटो चा उपयोग आग विझवण्यासाठी करण्यात आला.

ब्रांटोची वैशिष्ट्ये…

ब्रांटो गाडीचे वजन 45 टन इतके आहे. वजन जास्त असल्यामुळे यामध्ये पाण्याची सुविधा नाही. वेगळ्या टँकरच्या माध्यमातून त्याला पाणी पुरवावे लागते. त्यानंतर प्रेशर देऊन गाडीच्या मॉनिटर म्हणजेच केज पर्यंत पाणी फेकता येते. जर्मन टेक्नोलॉगीच्या ब्रांटो गाडीची (70 मीटर) किंमत 16 ते 18 कोटी इतकी आहे. ब्रांटो (70 मीटर) 2005 मध्ये पुण्यात दाखल झाली.

कोणत्या घटनांमध्ये होतो ब्राँटो चा उपयोग ?

उंच इमारतीत अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी (रेस्क्यू), उंच इमारतीत लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी या गाडीचा उपयोग होतो. तसेच उंच ठिकाणी अडकलेल्या पक्षांना आणि प्राण्यांना देखील याच्या मदतीने वाचवले जाते.

उंच इमारतीमधील गॅलरीतून नागरिकांनी, टेरेसवरून गाडीच्या केज मध्ये येणं हे धाडसाचं काम आहे. पुण्यामध्ये उंच इमारतींचे वाढते प्रमाण लक्षात घेता शहरामध्ये सब कंट्रोल रुम तयार करण्याचे काम सुरु आहे. शहरात चारही दिशांना चार सबकंट्रोल रुम तयार करून त्या चारही ठिकाणी किमान एक तरी अशी हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मची गाडी असावी असं नियोजन करण्यात येत आहे.

आगीची मुख्य कारणे ?

ज्या काही आगीच्या दुर्घटना घडतात त्यामध्ये शॉर्टसर्किट तसेच गॅस गळतीमुळे (एलपीजी लिकेज) लागलेल्या आगीच्या घटनांचं प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. इमारतींमध्ये वापरण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या वायरींमुळे शॉर्टसर्किट होऊन आगीच्या दुर्घटना घडतात. त्याचबरोबर अनेकदा गॅसची शेगडी अनावधानाने चालू राहून जाते आणि झालेल्या गॅस गळतीमुळे (एलपीजी लिकेज) आग लागते .

कोणती खबरदारी घेणं आहे महत्वाचं ?

इमारतींचे बांधकाम करत असताना चांगल्या दर्जाच्या वायरींचा वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याचबरोबर सावधगिरी बाळगून घरातील गॅस बंद करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा शेगडी बंद असल्याचे दिसते परंतु गॅस लीक होत असतो.  इमारत किती उंच असावी यावर आता कोणतेही बंधन राहिले नसल्याने पुण्यात उंच इमारतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलेले आहे. त्यामुळे त्या पद्धतीच्या आगप्रतिबंधक सुविधा आपल्याकडे असणे देखील आवश्यक आहे.

प्राणी आणि पक्ष्यांना जीवदान देणारी ब्रांटो !

आगीच्या दुर्घटनेव्यतिरिक्त या गाड्यांचा उपयोग पक्षी तसेच प्राणी उंच ठिकाणी अडकले असतील तर त्यासाठी देखील करण्यात येतो. बऱ्याचदा पक्षी उंच झाड, इमारतीचा सज्जा याठिकाणी अडकतात. त्यावेळी ब्रांटोच्या माध्यमातून त्यांची सुटका केली जाते. पतंग उडवण्यासाठी जो मांजा वापरला जातो त्यामध्ये अनेकदा पक्षी अडकतात. अशावेळी त्यांची सुटका करण्यासाठी ब्रांटोचा वापर केला जातो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.