मंचर – करोना व्हायरस आणि मांसाहाराचा कोणताही संबध नसल्याचे स्पष्ट झाल्याने चिकन खवय्यांनी चिकन खाण्यास सुरुवात केल्याने ब्रॉयलर कोंबडीचे बाजारभाव वाढू लागले आहेत. ब्रॉयलर कोंबडीचे होलसेल ट्रेडर खरेदीचे रेट एक किलोला 60 रुपयांदरम्यान आहेत; परंतु घाऊक बाजारात चिकन दुकानदारांना 70 ते 80 रुपये किलोप्रमाणे माल विकत आहे. गावोगाव असणारे किरकोळ दुकानदार 140 ते 160 रुपये दराने ग्राहकांना चिकन विकत आहेत.
लॉकडाऊन होण्याआधी समाज माध्यमांवरून करोनाचा प्रादुर्भाव हा ब्रॉयलर कोंबड्यांमुळे होतो अशी अफवा पसरवली गेली होती, त्यामुळे चिकनचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळले होते. या काळात अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी शंभर रुपयांना तीन कोंबड्य विकल्या होत्या. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आणि संगोपनासाठी पक्षी देणाऱ्या कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
मात्र, यात काहीच तथ्य नसल्याचे लक्षात आल्यामुळे गेल्या आठवड्यापासून मांसाहार करणाऱ्या चिकन प्रेमींनी चिकन खाण्यास सुरुवात केल्याने चिकनचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे.करोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे 5 ते 10 रुपये प्रतिकिलो बाजारभावाने होलसेल दुकानदार पोल्ट्री व्यावसायिकाकडुून ब्रॉयलर पक्षी खरेदी करत होते; परंतु आता करोना व्हायरस आणि मांसाहाराचा कोणताही संबध नसल्याने चिकन आता 140 ते 160 रुपये किलो दराने मिळत असल्याचे कळंब येथील चिकन व्यावसायिक इसाक शेख, जावेद मिस्त्री, इम्रान मोमीन यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारमधील पशुसंवर्धन विभागाने करोना व्हायरस आणि मांसाहाराचा कोणताही संबध नसल्याचे वारंवार स्पष्ट केल्याने नागरिकांचा कल पुन्हा मांसाहाराकडे वाढू लागल्याचे दिसून येत आहे.
बाजारभाव 200 रुपये किलोवर जाणार ग्राहकाकंडून गेले दिड महिने ब्रॉयलर पक्ष्याला मागणी नसल्याने पोल्ट्री व्यावसायिक आणि कंपनी चालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे कंपनी चालकांनी छोट्या पिल्लांचे उत्पादन बंद केले होते. काही पोल्ट्रीमध्ये पिल्ले टाकणे बंद केल्यामुळे बाजारामध्ये आता पुरेसा ब्रॉयलर पक्ष्यांचा माल नाही. गेल्या चार-पाच दिवसांत ब्रॉयलर कोंबडी लिफ्टिंग रेटमध्ये किलोमागे दररोज दहा ते वीस रुपयांनी वाढ होत आहे. ब्रॉयलर कोंबडीचे चिकन लवकरच 200 रुपये किलोची पातळी गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर घरपोच डिलेव्हरी करोनाला रोखण्यासाठी बहुतांशी ठिकाणी चिकन विक्री करणारे व्यवसायिक घरपोच डिलिव्हरी देत आहेत, तर काही ठिकाणी चिकन व्यवसायिक दूरध्वनीद्वारे ग्राहकांची ऑर्डर घेऊन माल तयार झाल्यानंतर ग्राहकांना येऊन घेऊन जाण्यास सांगत आहेत. सरकारच्या आदेशाने अत्यावश्यक सेवेत चिकन, मटण, अंडी व मच्छी यांचा समावेश केला आहे.
ब्रॉयलर कोंबडीचे होलसेल ट्रेडर खरेदीचे रेट एक किलोला 60 रुपयांदरम्यान आहेत; परंतु घाऊक बाजारात चिकन दुकानदारांना 70 ते 80 रुपये किलोप्रमाणे माल विकत आहेत, तर किरकोळ दुकानदार 140 ते 160 रुपये दराने ग्राहकांना चिकन विकत आहेत.
– शफीभाई मोमीन, आंबेगाव ऍग्रो