ढेबेवाडी – ढेबेवाडी विभागातील मालदन, ता. पाटण येथील ब्रिटिशकालीन पोलीस चौकीला अखेरची घरघर लागली आहे. या चौकीचे अस्तित्वच संपत चालले आहे. पोलीस चौकीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. पोलिस चौकीच्या सभोवती मोठ्या प्रमाणात झाडेझुडपेही वाढली आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने वरिष्ठांकडे याबाबतची माहिती देवून ब्रिटीशकालीन ठेवा जतन करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
ब्रिटिशांच्या काळात विभागावर नियंत्रणासाठी मालदन येथे पोलीस चौकी उभारण्यात आली होती. त्यांतर्गत विभागातील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांचा या पोलीस चौकीशी संबंध येत होता. तक्रारदाराला पोलिसात दाद मागण्यासाठी मालदनला जावे लागत होते. या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचारीही काम करत होते. अनेक ऐतिहासिक घटना व प्रसंगाची साक्षिदार असलेली ही पोलीस चौकी ब्रिटीश राजवटीत मालदन येथेच होती.
ढेबेवाडी-कराड मार्गावरील वांग नदीवर पूल झाल्यानंतर ढेबेवाडी हे विभागाचे प्रमुख व मध्यवर्ती ठिकाण बनल्याने ढेबेवाडीला बाजारपेठेचा दर्जा आला व हळूहळू विविध शासकीय कार्यालये येथे सुरू झाली. त्याचवेळी ढेबेवाडी येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. कालांतराने मालदनची पोलीस चौकी बंद करण्यात आली.
या ब्रिटिशकालीन पोलीस चौकीची अनेक वर्षांपासून देखभाल झाली नसल्याने या चौकीचे उरले सरलेले अस्तित्वही संपण्याच्या मार्गावर आहे. केवळ दुर्लक्षामुळे ही अवस्था निर्माण झाली असून सध्या या बिटिशकालीन चौकीला कोणीही वाली नसल्याचे चित्र दिसत आहे. गावाबाहेर एका बाजूला असलेल्या या चौकीचा काही वर्षे ग्रामस्थांकडून सार्वजनिक कामासाठी वापर होत होता. त्यामुळे त्या इमारतीची देखभालही होत होती. मात्र कालांतराने इमारतीचा वापर बंद झाल्याने तिची दुर्दशा झाली आहे.