लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पुढील आठवड्यातील पूर्वनियोजित भारत दौरा रद्द झाला आहे. करोना संकटामुळे जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द होण्याची चालू वर्षातील ही दुसरी वेळ आहे.
भारत दौरा रद्द झाल्याबद्दल जॉन्सन यांनी खंत व्यक्त केली.
भारतातील स्थिती पाहता माझा दौरा रद्द करण्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सहमती झाल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. आता दोन्ही देशांमधील संबंधांना आणखी बळकटी देण्याच्या उद्देशातून मोदी आणि जॉन्सन यांच्यात व्हर्च्युअल संवाद होणार असल्याचे समजते. त्यानंतर पुढील काही महिन्यांत जॉन्सन यांच्या भारत दौऱ्याची पुन्हा तयारी केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या आधी भारतीय प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जॉन्सन यांना निमंत्रित करण्यात आले होते. ते निमंत्रण स्वीकारत जॉन्सन यांनी भारत दौरा निश्चित केला होता. मात्र, त्यावेळी ब्रिटनमधील करोना संकट गहिरे बनल्याने त्यांना तो दौरा रद्द करावा लागला. आता भारतात करोना संकट गडद बनले आहे.