अखेर लस आली…ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून लसीकरण

लंडन – युनायटेड किंगडम अर्थात ब्रिटनने फायझर बायोएनटेकच्या लसीला मंजुरी दिली आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांनी कोणता निर्णय घेण्याच्या अगोदरच लसीला मंजुरी देणारा ब्रिटन जगातला पहिला देश ठरला असून या देशात पुढच्या आठवड्यापासून प्रत्यक्ष लसीकरणाच्या प्रक्रियेला सुरूवात केली जाणार आहे.

कोविडवरची लस तयार करण्यात आम्हाला यश आले असल्याचे गेल्याच आठवड्यात फायझर कंपनीने जाहीर केले होते. ही लस करोनावर 96 टक्के परिणामकारक ठरली असल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला होता. कालच जर्मनीची कंपनी बायोएनटेक आणि त्यांची अमेरिकी भागिदार कंपनी फायझरने युरोपीय महासंघासमोर लसीच्या नोंदणीसाठी अर्ज सादर केला आहे.

ब्रिटनच्या औषधे आणि आरोग्य उत्पादन नियामक समितीने फायझर बायोएनटेकच्या लसीच्या परिणामांच्या पडताळणीस मंजूरी दिली आहे. ऑक्‍सफर्ड विद्यापीठाकडूनही लस तयार करण्यात आली आहे. ही लस निर्धारित निकषांच्या कसोटीवर खरी उतरते की नाही, याची पडताळणीही याच समितीकडून केली जाणार आहे.

जर फायझर बायोएनटेकची लस सर्व निकषांवर पात्र ठरली आणि तिला मंजुरी देण्यात आली तर पुढच्या काही तसांत ब्रिटनमध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे वृत्त ब्रिटनचे मंत्री नदीम जहावी यांच्या हवाल्याने देण्यात आले आहे.

हा विज्ञान आणि मानवतेसाठी मोठा दिवस असल्याचे फायझरचे अध्यक्ष आणि सीईओ डॉ. अल्बर्ट बोरला यांनी म्हटले आहे. तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीच्या पहिल्याच सेटमध्ये आमची लस करोनाच्या विरोधात अत्यंत परिणामकारक असल्याचे सिध्द झाले आहे. जेव्हा संपूर्ण जगाला लशीची गरज असताना नवे मापदंड प्रस्थापित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

कंपनीच्या दाव्यानुसार करोनाला अटकाव करण्यासाठी फायझरची लस 90 टक्के प्रभावशाली ठरली आहे. करोनाच्या 94 प्रकरणांत या दाव्याला दुजोरा अथवा पुष्टीही मिळाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कंपनीने घेतलेल्या चाचणीत 43 हजार 538 लोक सहभागी झाले होते. यात 42 टक्के लोक असे होते की त्यांनी करोनाला रोखण्यासाठी कोणतीही काळजी अथवा खबरदारी घेतली नव्हती. त्या संदर्भातील आकड्यांची आता फेरतपासणी केली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.