लंडन: दाऊद इब्राहीम याचा निकटचा साथीदार टायगर हनिफ याला हस्तांतरित करण्याची भारताची मागणी ब्रिटिश सरकारने फेटाळली आहे. सूरत मध्ये सन 1993 मध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोट प्रकरणात टायगर हनिफ हा प्रमुख आरोपी आहे. मोहंमद हानिफ उमरजी पटेल असे त्याचे मूळ नाव आहे. तो ग्रेटर मॅनचेस्टरच्या परिसरातील बोल्टन गावात रहात असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी सन 2010 मध्ये अटक केली होती.
टायगर हनिफला भारताच्या हवाली करण्याचा आदेश तत्कालिन गृहमंत्री थेरेसा मे यांनी जून 2012 मध्ये दिला होता. त्या आदेशाला त्याने तेथील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आपल्याला भारताच्या हवाली केले तर भारतातील पोलीस आपला छळ करतील असा युक्तिवाद त्याच्यावतीने तेथे करण्यात आला होता. पण कोर्टानेही गृहमंत्र्यांचा आदेश वैध ठरवून त्याला मायदेशी धाडण्याचा आदेश दिला होता.
तथापी भारत आणि ब्रिटन यांच्यात जो गुन्हेगार हस्तांतरण करार झाला आहे, त्यात कोणत्याही आरोपीला भारताच्या हवाली करायचे किंवा नाही हा निर्णय घेण्याचा पुर्णाधिकार तेथील गृहमंत्र्यांना आहे. त्यानुसार तेथील गृहमंत्र्यांनी त्याला भारताच्या हवाली करण्यास नकार दिला आहे. सध्या विजय मल्ल्याचीही केस ब्रिटिश गृहमंत्र्यांच्या पुढे आहे त्यावर मात्र भारतीय वंशाच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी अजून निर्णय घेतलेला नाही.