महायुतीला कौल देऊन स्थिर सरकार आणावे – नितीन बानुगडे पाटील

ओतूर – देशाला स्थिर सरकार तेव्हाचं मिळते जेंव्हा कुणा एका पक्षाला बहुमत मिळते. हे बहुमत भाजप-शिवसेना महायुती वगळता दुसऱ्या कोणालाही मिळण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे बहुमत मिळणार नाही अशांना मत देणं म्हणजे मत वाया घालविण्यासारखं आहे. आपल्या मताचा योग्य मान राखून महायुतीला कौल देऊन स्थिर सरकार आणावे आणि स्थिर सरकारच्या बळावर देशाचे संरक्षण करा, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते व शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले.

शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय-शिवसंग्राम-रयतक्रांती महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रा. बानगुडे पाटील यांच्या ओतूर, कळंब आणि न्हावरा येथे सभा झाल्या. त्यावेळी ओतूर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनावणे, राम गावडे, जयसिंग ऐरंडे, रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले, सुनील मेहेर, माऊली खंडागळे, संभाजी तांबे, भाजपचे भगवान घोलप, शरद चौधरी, दिलीप डुंबरे, रिपाईचे गौतम लोखंडे, प्रसन्न डोके, गणेश कवडे, शाम पांडे, उल्हास नवले, महिला आघाडीच्या संगीता वाघ आदी उपस्थित होते.

प्रा. बानुगडे पाटील म्हणाले की, काश्‍मीर हा या देशाचा अविभाज्य भाग आहे. त्यासाठी 370 कलम रद्द झालचं पाहिजे, तरच व काश्‍मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग राहील. पण, आज परिस्थिती काय आहे बघा. कॉंग्रेस सांगतेय 370 कलम आम्ही रद्द करणार नाही, तर फारुखअब्दुला सांगत आहेत 370 कलम रद्द केले तर आम्ही काश्‍मीर स्वतंत्र करू. अरे या देशाचा भाग आहे तो, काळजाचा तुकडा आहे. काश्‍मीर, कसा तोडू देऊ आम्ही? आता तुम्हाला विचार करायचा आहे की, आपल्याला कोण हवंय, देश जोडणारे की तोडणारे? कॉंग्रेस-राष्ट्रवादीची धोरणं ही देश तोडणारी तर महायुतीची धोरणं देश जोडणारी आहेत.

ही निवडणूक नगरपंचायतीची नाही, ही निवडणूक जिल्हा परिषदेची किंवा विधानसभेची ही नाही. तर, ही निवडणूक लोकसभेची आहे, त्यादृष्टीने आपल्याला मतदान करायचे आहे. कॉंग्रेसने निवडणुकीचा जाहीरनामा काढला, काय होतं या जाहिरनाम्यात. देशद्रोहाचं कलम रद्द करू. म्हणजे कुणीही देश तोडायची भाषा करायची, या देशाचा तिरंगा कुणीही जाळावा आणि आम्ही काहीच करायचं नाही? हे या हिंदुस्थानात चालणार नाही. म्हणूनच मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्हाला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मतदान करायचे आहे, असे आवाहनही बानुगडे पाटील यांनी केले.

या सभेत आमदार शरद सोनावणे, जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवानराव घोलप, आरपीआयचे तालुकाध्यक्ष गौतम लोखंडे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, भानुविलास गाढवे, संभाजी तांबे आदींचीही भाषणे झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.